स्वदेशी ‘कु’ वर आरएसएसचे खाते

माहिती तंत्रज्ञान नियमावली वरून केंद्र सरकार आणि ट्विटर मध्ये युध्द सुरु असल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ( आरएसएस) ने देशी मायक्रोब्लॉगिंग साईट ‘कु’ वर खाते उघडले आहे. विशेष म्हणजे या पूर्वीही अनेक मंत्री आणि मंत्रालयांनी ट्विटर सोडून कु या देशी पर्यायाचा स्वीकार केला आहे. ट्विटर आणि केंद्रातील भाजप सरकार मधील लढाईत भाजपचे मातृसंघटन आरएसएसची कु वरील एन्ट्री विशेष महत्वाची मानली जात आहे. ‘कु’ वर राजकारण, खेळ, मनोरंजन क्षेत्रातील बड्या व्यक्तींनी खाती उघडली आहेत.

गतवर्षी जुलै मध्ये लाँच झालेले ‘कु’ वेगाने लोकप्रिय होत असून ज्या बड्या हस्तींचा काही ना काही कारणाने ट्विटर बरोबर वाद झाला आहे असे सेलेब्रिटी ‘कु’ ला पसंती देत आहेत असे दिसून आले आहे. लडाखचा चुकीचा नकाशा, बीजेपी प्रवक्त्यांच्या पोस्ट मध्ये फेरफार करणे, उपराष्ट्रपती,, संघ नेत्यांच्या हँडल वरील ब्लू टिक हटविणे, रविशंकर प्रसाद यांचे अकौंट काही वेळ ब्लॉक करणे अश्या कारवायांमुळे ट्विटर अडचणीत आले आहे.

स्वदेशी ‘कु’ वर आरएसएसची पहिली पोस्ट डॉ. हेडगेवार यांच्या फोटोने केली गेली आहे. १९२५ मध्ये डॉ. हेडगेवार यांनी आरएसएसची स्थापना केली होती आणि ते पहिले सरसंघचालक होते. आरएसएसच्या पोस्ट हिंदी भाषेत केल्या जाणार आहेत. त्यावर संघाचे विचार, निर्णय या संदर्भात माहिती दिली जाणार आहे. पहिल्या पोस्ट मध्ये चित्रकुट येथे होत असलेल्या पाच दिवसीय चिंतन शिबिराची माहिती दिली गेली आहे.