युरो कप फायनलचा थरार वाढवतोय करोनाची भीती
२९ दिवस आणि ४६ सामने पार पडल्यावर युरो कप फुटबॉल टूर्नामेंटमध्ये विजेतेपदासाठी अंतिम लढत इंग्लंड आणि इटली यांच्यात होत आहे. ११ जुलैला लंडनच्या वेम्बर्ली स्टेडियम मध्ये होणाऱ्या या लढतीसाठी स्टेडियम पूर्ण क्षमतेने म्हणजे ९० हजार प्रेक्षक क्षमतेने भरलेले असेल. पण त्यामुळे या दोन्ही देशात करोनाचा पुन्हा उद्रेक होऊ शकतो अशी भीती सुद्धा व्यक्त केली जात आहे.
अंतिम सामन्याच्या तिकिटांचे दर अस्मानाला भिडले आहेत. ईयूएफएच्या अधिकृत साईटवर तिकिटे सोल्ड आउट झाली असून आता तिकिटांचा काळाबाजार जोरात सुरु झाला आहे. भारतीय चलनात ८३ हजार रुपयांच्या तिकीटाची विक्री काळ्याबाजारात चक्क ५६ लाख रुपयात होत असल्याचे समजते. इंग्लंड मधील फुटबॉलप्रेमी हा सामना चुकविण्याची शक्यता नाही. कारण ६० वर्षांच्या प्रतिक्षेनंतर इंग्लंड प्रथमच अंतिम फेरीत दाखल झाले आहे. इंग्लंड ट्रॉफी जिंकणार असे वातावरण देशात आहे.
इटलीने ही स्पर्धा १९६८ मध्ये जिंकली होती पण २००० व २०१२ मध्ये ते रनर अप होते. या सामन्याची सर्व तिकिटे संपली असून सर्वात महाग तिकीट ८३६०० रुपयेना तर सर्वात स्वस्त, फॅन्स फर्स्ट स्कीमचे तिकीट ८४०३ रुपयांना विकले गेले आहे. डेली मेलच्या बातमीनुसार काळ्या बाजारात फुटबॉल चाहते कितीही किंमत तिकिटासाठी मोजायला तयार आहेत.
वेम्बर्ली स्टेडियम मध्ये अगोदर करोना प्रतिबंध पाळण्यासाठी ६० हजार प्रेक्षकांची सोय केली गेली होती मात्र इंग्लंड अंतिम फेरीत आल्यामुळे हे नियम ढाब्यावर बसविले जातील अशी लक्षणे दिसत आहेत. इंग्लंडने उपांत्यफेरी जिंकल्यावर रस्त्यावर हजारोंच्या संखेने लोक उतरले आणि करोना नियमावली न पाळता त्यांनी आनंद साजरा केला त्यामुळे करोना फैलाव भीती वाढली आहे.
युरो कप सुरु झाल्यापासून युरोपीय देशात करोना रुग्णात ४३ टक्के वाढ झाल्याचे दिसून आले आहे. ११ देशात ही स्पर्धा खेळली जात असून इंग्लंड मध्ये गेल्या आठवड्यात दररोज २७ हजार नवे करोना रुग्ण सापडत आहेत. ही संख्या जून जुलैच्या रुग्ण संख्येच्या चौपट आहे असे समजते.