माही भैय्या नसेल तर २०२२ आयपीएल खेळणार नाही- सुरेश रैना

टीम इंडियाचा माजी खेळाडू सुरेश रैना याने चेन्नई सुपरकिंग्स कप्तान महेंद्रसिंग धोनी संदर्भात केलेले व्यक्तव्य अनेकांना हैराण करून गेले आहे. रैनाने पुढची आयपीएल माही खेळणार नसेल तर तोही आयपीएल खेळणार नाही असे जाहीर केले आहे. काही सिनिअर्स माही कदाचित पुढच्या आयपीएल मध्ये नसेल असा अंदाज व्यक्त करत आहेत. त्याबद्दल न्यूज २४ वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सुरेश रैनाला एका प्रश्न विचारला गेला होता.

‘अजून किमान ४ ते ५ वर्षे तुझे क्रिकेट करियर आहे, सीएसके पासून वेगळा झालास तर कुठली टीम जॉइन करणार’, असा प्रश्न रैनाला विचारला गेला तेव्हा त्याने ‘माही भाई नसेल तर मी आयपीएल खेळणार नाही’ असे उत्तर दिले. रैना म्हणाला यंदा आम्ही आयपीएल ट्रॉफी जिंकली तर पुढच्या वर्षासाठी मी माहीला पटवेन कारण २०२२ च्या आयपीएल ला आता फार वेळ राहिलेला नाही.

रैनाने धोनीने संन्यास घेतल्याची घोषणा केल्यावर काही दिवसातच १५ ऑगस्ट २०२० मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्ती जाहीर केली होती. त्याचा हा निर्णय अनेकांना धक्का देऊन गेला होता. आता आयपीएल बाबत रैनाने केलेले वक्तव्य म्हणूनच चर्चेत आले आहे. यंदाच्या आयपीएल मध्ये चेन्नईची सुरवात चांगली झाली असून ते पॉइंट टेबल मध्ये दुसऱ्या स्थानी आहेत. करोना मुळे स्थगित झालेल्या आयपीएलचे उर्वरित सामने सप्टेंबर पासून खेळले जाणार आहेत.