राष्ट्रवादीच्या गडात शिवसेनेची गर्जना; पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेमध्ये बसवणार महापौर


पुणे – शिवसेनेचे ५० नगरसेवक पिंपरी-चिंचवड महापालिका आगामी निवडणुकीत निवडून येणार असून महानगरपालिकेत सेनेचाच महापौरही होणार, असल्याचे भाकीत करत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेच्या ‘मिशन ५०’ ची घोषणा केली. तसेच सन्मानाने जागा वाटप झाले, तरच आघाडी करणार, असे स्पष्ट करत राऊत यांनी अप्रत्यक्षपणे स्वबळाची घोषणा केली. शिवसेनेचा मुख्यमंत्री ५६ आमदारांच्या जोरावर होतो, तर ५० नगरसेवकांवर नक्कीच सेनेचा महापौर होणार, असे सांगत महापौरपदासाठीची रणनीतीही त्यांनी स्पष्ट केली.

शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत शुक्रवारी पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या तयारीसाठी तीनही विधानसभा मतदारसंघातील शिवसेना पदाधिकाऱ्यांचा मेळावा झाला. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत राऊत यांनी महानगरपालिकेतील भ्रष्टाचार, निवडणुकीतील आघाडी, जागा वाटप याबाबत शिवसेनेची भूमिका मांडली. खासदार श्रीरंग बारणे, उपनेते रवींद्र मिर्लेकर, माजी खासदार, उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील, किमान वेतन सल्लागार मंडळाचे अध्यक्ष रघुनाथ कुचिक, राज्य संघटक गोविंद घोळवे, सहसंपर्कप्रमुख योगेश बाबर, शहरप्रमुख सचिन भोसले, माजी आमदार गौतम चाबुकस्वार, जिल्हा संघटिका सुलभा उबाळे, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, नगरसेवक अमित गावडे उपस्थित होते.

शिवसेनेचाच महापौर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत बसवायचा या जिद्दीने कार्यकर्ते कामाला लागले आहेत. भाजपने भय आणि भ्रष्टाचार मुक्त पिंपरी-चिंचवड अशा घोषणा पाच वर्षापूर्वी दिल्या होत्या. पण, या पाच वर्षात भय आणि भ्रष्टाचाराचा अंत झाला नाही. यापेक्षा जास्त वाढताना दिसत आहे. भयमुक्त आणि भ्रष्टाचार मुक्त पिंपरी-चिंचवड हाच मुद्दा घेऊन शिवसेना महानगरपालिकेची आगामी निवडणूक लढविणार आहे. आम्ही दाखवून देऊ महापालिका कशी चालवायची, शहर कसे ठेवायचे, लोकांना सुरक्षा कशी द्यायची, असे राऊत यांनी सांगितले.

भाजपची महानगरपालिकेत सत्ता आहे. पण, त्यांचे अनेक नगरसेवक राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधून आलेले आहेत. आता हे अर्धे उठून राष्ट्रवादीत जातील. येथे ओरिजनल पक्ष शिवसेनाच असल्याचे सांगत बेडूक उड्यातून भय आणि भ्रष्टाचार मुक्त शहर होणार आहे का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. आघाडीबाबत बोलताना, ते योग्य वेळी ठरवू, सन्मानाने जागा वाटप झाले, तर आम्ही आघाडीचा विचार करू, आघाडी होणार नसल्याचे आम्ही म्हणत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

जनतेच्या पैशांची महानगरपालिकेत लूट होत आहे. भय, भ्रष्टाचारमुक्त घोषणा ही ठेकेदारीची रिंग आहे. दोन्ही आमदारांसह येथील सगळे प्रमुख लोक महानगरपालिकेतील ठेकेदारीमध्ये गुंतले आहेत. पण, आता महानगरपालिकेतील भ्रष्टाचाराची सगळी प्रकरणे मंत्रालयापर्यंत पोहोचली आहेत. स्मार्ट सिटीतील भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या कंपनीचा कोट्यवधी रुपयांचा घोटाळा उघडकीस आला आहे. त्याची तक्रार ईडीकडे करणार असल्याचे राऊत यांनी सांगितले.