लहान मुलांना कोरोनाच्या प्रादुर्भावाबाबत संशोधकांनी केला ‘हा’ दावा


लंडन: कोरोनाचे थैमान संपूर्ण जगभरात अद्याप सुरूच आहे. भारतातील कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत लहान मुलांना अधिक धोका असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अशातच ब्रिटनमधील सार्वजनिक आरोग्य आकडेवारीच्या विश्लेषणातून महत्त्वाची माहिती समोर आली आहे. कोरोनाच्या विषाणूने लहान मुले आणि किशोरवयीन मुलांमध्ये गंभीर आजारी होण्याचा आणि मृत्यू होण्याचा धोका कमी असल्याचे समोर आले आहे.

हा अभ्यास युनिर्व्हसिटी कॉलेज लंडन, युनिर्व्हसिटी ऑफ ब्रिस्टल, युनिर्व्हसिटी ऑफ यॉर्क आणि युनिर्व्हसिटी ऑफ लिव्हरपूलच्या संशोधकांनी केला आहे. १८ वर्षाखालील कमी वयाच्या मुलांसाठी लसीकरण मोहिमेबाबतही संशोधकांनी सुचना केली आहे. तीन अभ्यास-संशोधनाचे संशोधकांनी विश्लेषण केले आहे. एका अभ्यासानुसार, इंग्लंडमधील १८ वर्षाच्या कमी वयोगटातील २५१ लोकांना फेब्रुवारी २०२१ पर्यंत कोरोनावरील उपचारासाठी अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते.

कोरोनाची लागण याआधीच एखाद्या आजाराने ग्रस्त असलेल्या युवकांना, बालकांना झाल्यास गंभीर आजारी होण्याचा धोका असल्याचे संशोधकांनी सांगितले. संशोधकांच्या दाव्यानुसार, ब्रिटनमध्ये ४७ हजार ९०३ लोकांपैकी एक किशोरवयीन मुलाला सार्स सीओव्ही-२ ची बाधा होण्याचा आणि आयसीयूमध्ये दाखल होण्याची शंका होती. एका अन्य संशोधनानुसार, इंग्लंडमध्ये कोरोनामुळे २५ मुले आणि किशोरवयीन मुलांचा मृत्यू झाला होता. जवळपास चार लाख ८१ हजार लोकांपैकी एक अथवा दहा लाख बाधितांमागे दोघांनाच मृत्यूचा धोका होता.

याबाबत माहिती देताना या दोन्ही संशोधनाचे प्रमुख संशोधक प्रा. रसेल वाइनर यांनी सांगितले की, नवीन संशोधनानुसार, लहान मुलांमध्ये, किशोरवयीन मुलांच्या गटामध्ये सार्स-सीओवी-२ मुळे गंभीर आजार, मृत्यू होण्याचा धोका कमी आहे. तिसऱ्या संशोधनानुसार, ५५ रिसर्च पेपरचे (संशोधनांचे) विश्लेषण केल्यानंतर समान निष्कर्ष समोर आले आहेत.