लस नाही तर जॉब नाही; फिजी सरकारचा मोठा निर्णय


सुवा – संपूर्ण जगाचे अर्थचक्र कोरोनामुळे विस्कळीत झाले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक देशांनी लॉकडाऊनसारखा कठोर निर्णय घेतला. पण त्यामुळे अर्थचक्रावर परिणाम झाल्याचे दिसून आल्यामुळे काही देशांनी निर्बंध शिथिल करत अर्थचक्राला गती देण्यासाठी नियमावली आखली. पण नागरिकांना दिलेली सूट आणि नियमांचं उल्लंघन यामुळे कोरोनाने पुन्हा एकदा हातपाय पसरण्यास सुरुवात केली.

फिजी सरकारने यावर एक सूचना जारी केली आहे. कोरोनाची लस न घेतलेल्यांना नोकरी देऊ नये, असे आदेश फिजीचे पंतप्रधान फ्रँक बेनीमारामा यांनी दिले आहेत. हा आदेश कठोर वाटत असला तरी, त्यामागे कोरोनाचा फैलाव होऊ नये, या भावना असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे. दुसरीकडे कोरोनाची लस घेतली नाही तर नोकरी गमवावी लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केल्यामुळे देशात प्रत्येकाला कोरोनाची लस घेणे अनिवार्य झाले आहे. देशात कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटचे रुग्ण आढळल्यानंतर पंतप्रधान बेनीमारामा यांनी हे आदेश दिले आहेत.

कोरोना लसीचा पहिला डोस १५ ऑगस्टपर्यंत न घेणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना सक्तीच्या सुट्टीवर पाठवले जाणार आहे. तर १ नोव्हेंबरपर्यंत कोरोना लसीचा दुसरा डोस न घेतल्यास त्यांना कामावरून काढण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दुसरीकडे खासगी कंपन्यांनाही ताकीद देण्यात आली आहे. लसीकरण गंभीरतेने न घेतल्यास मोठा दंड भरावा लागेल असे सांगितले आहे.

१ ऑगस्ट खासगी कर्मचाऱ्यांसाठी डेडलाइन निश्चित करण्यात आली आहे. त्याचबरोबर ज्या कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांनी लस घेतली नसेल. त्या कंपन्या बंद करण्याचा इशारा देखील दिला आहे. लस नाही तर जॉब नाही, कोरोनापासून बचावासाठी लस एकमात्र उपाय आहे. या आधारावर आम्ही नवी नियमावली आखली आहे. लस न घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना जॉब गमवावा लागेल, असे फिजीचे पंतप्रधान फ्रँक बेनीमारामा यांनी सांगितले.

देशाच्या अर्थव्यवस्थेत गेल्या वर्षी कोरोनामुळे १९ टक्क्यांनी घट झाली होती. आंतरराष्ट्रीय पर्यटकांना देशात येण्यास बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे त्याचा थेट परिणाम अर्थव्यवस्थेवर झाला होता. फिजीमध्ये अर्ध्याहून अधिक रोजगार हा पर्यटन व्यवसायावर अवलंबून आहे. फिजी या देशात आतापर्यंत ८ हजार ६६१ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी ४८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १ हजार ४५६ जणांना कोरोनावर मात केली आहे. सध्या देशात ७ हजार १५७ कोरोनाचे रुग्ण आहेत, ही माहिती वर्ल्डोमीटर या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. पण देशात गेल्या दोन महिन्यांपासून कोरोनाच्या डेल्टा व्हेरियंटने हातपाय पसरण्यास सुरुवात केल्यामुळे सरकारची चिंता वाढली आहे.