कोरोनाविरुद्धच्या लढ्यात कोणताही बेजबाबदारपणा सहन करणार नाही – नरेंद्र मोदी


नवी दिल्ली – पंतप्रधान मोदींनी गुरुवारी घेतलेल्या नव्या मंत्रीमंडळाच्या पहिल्याच बैठकीमध्ये कोरोनाविरुद्धच्या लढ्यात कोणत्याही प्रकारचा बेजबाबदारपणा सहन केला जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. मागील काही दिवसांमध्ये अनेक ठिकाणी लोक मास्क न वापरता, सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन न करता गर्दी करत असल्याचे व्हिडीओ आणि फोटो समोर येत असल्याचा दाखला देत मोदींनी हा इशारा दिला. मास्क न घालता फिरणे याबद्दल आपल्या सर्वांच्याच मनात भीती असायला हवी, असे म्हणताच मोदींनी अप्रत्यक्षपणे मास्क न घालता लोकांनी घराबाहेर पडू नये, असे म्हटले आहे.

कोरोना प्रोटोकॉल्स आणि नियमांचे देशातील अनेक भागांमधील लोक पालन करत नसल्याबद्दल मोदींनी नाराजी व्यक्त केल्याचे सुत्रांनी एएनआयशी बोलताना सांगितले. त्याचबरोबर मोदींनी ही अशी मास्क न घालता, सोशल डिस्टन्सिंग न पाळता फिरणाऱ्या गर्दीची दृष्य चांगली नसल्याचेही म्हटले आहे. मंत्रिमंडळ विस्तारानंतर नवीन सहकाऱ्यांसोबतच्या पहिल्याच बैठकीत मोदींनी कोरोनासंदर्भातील परिस्थितीबद्दलची ही नाराजी उघडपणे बोलून दाखवली.

आपण असे अनेक व्हिडीओ आणि फोटो मागील काही दिवसांपासून पाहत आहोत, जिथे लोक मास्क न घालता, सोशल डिस्टन्सिंग न ठेवता फिरताना दिसत आहेत. हे चांगले नाही. या अशा वागण्यामुळे आपल्या मनात भीती निर्माण झाली पाहिजे, असे मोदींनी नेत्यांशी बोलताना म्हटले.

देशाने कोरोनाविरुद्ध दिलेला लढा हा पूर्ण ताकदीने दिल्याचे पंतप्रधान मोदींनी सांगतानाच याचे श्रेय पहिल्या फळीतील कोरोना योद्ध्यांना दिले. सध्या देशात मोठ्याप्रमाणात लसीकरण सुरु असून चाचण्यांची संख्याही समाधानकारक असल्याचेही मोदींनी अधोरेखित केले. सध्याच्या परिस्थितीमध्ये बेजबाबदारपणा आणि निष्काळजीपणा आपल्याला परवडणार नाही. एक साधी चूक झाली, तरी त्याचा मोठा परिणाम कोरोनाविरुद्धच्या आपल्या लढ्यावर होऊ शकतो, असे मोदी म्हणाले.

मागील काही महिन्यांच्या तुलनेत आता कोरोनाबाधितांची संख्या कमी झाल्यामुळे लोकांना भटकण्याची इच्छा होत असणार. पण अद्याप कोरोना संपलेला नाही आणि तो पूर्णपणे नष्ट होण्यासाठी बराच काळ लागणार आहे. काही देशांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा झपाट्याने वाढली आणि हा विषाणूही सतत आपले स्वरुप बदलत असल्यामुळे सावध राहण्याची गरज असल्याचे मोदींनी सांगितले.

मंत्री म्हणून लोकांच्या मनात भीती निर्माण करण्याऐवजी आपण त्यांना कोरोनासंदर्भातील सर्व खबरदीचे उपाय आणि नियमांचे पालन करण्यास प्रोत्साहन दिले पाहिजे. यामुळे आपल्याला भविष्यात या साथीवर मात करता येईल, असे मोदी म्हणाले. तसेच महाराष्ट्र, केरळसोबतच इतर काही राज्यांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याबद्दलही त्यांनी बैठकीत चिंता व्यक्त केल्याचे सुत्रांनी सांगितले.