उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग-उनच्या प्रकृतीवरुन चर्चेला उधाण


प्योंगप्यांग – पुन्हा एकदा उत्तर कोरियाचे हुकूमशाह किम जोंग-उन चर्चेत आले आहेत. यासाठी किम जोंग उन यांचं घटलेले वजन कारणीभूत आहे. तब्बल २० किलो किम जोंग उन यांचे वजन कमी झाल्यामुळे पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे. दरम्यान दक्षिण कोरियाच्या नेत्याने गुप्तचर यंत्रणेच्या हवाल्याने किम जोंग उन यांची प्रकृती उत्तम असल्याचे सांगितले आहे. ब्लूमबर्गने दिलेल्या वृत्तानुसार, किम जोंग उन यांचे वजन १० ते २० किलो कमी झाल्याची माहिती दक्षिण कोरियाच्या गुप्तचर विभागाने दिली आहे.

प्रकृतीसंबंधी जर काही समस्या असतील तर त्यांच्यावर उपचाराची जबाबदारी असणाऱ्या रुग्णालयाला औषधांचा पुरवठा होत असल्याची माहिती मिळाली असती. पण तसे काहीही झालेले नसल्याची माहिती दक्षिण कोरियाचे खासदार किम बायंग-की यांनी दिली आहे. यावेळी त्यांनी किम जोंग-उन अद्यापही तासनतास चालणाऱ्या बैठकांमध्ये सहभागी होत असून त्यांच्या चालण्यातही कोणता फरक जाणवत नसल्याचे म्हटले आहे.

मे महिन्यापासून ३७ वर्षीय किम जोंग-उन सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर असल्यामुळे चर्चा रंगली होती. पण जेव्हा जून महिन्यात सरकारी बैठकीत सहभागी होण्यासाठी सर्वांसमोर आले, तेव्हा पहिल्यापेक्षा फार बारीक दिसत होते. उत्तर कोरियामधील सरकारी वृत्तवाहिनीने, बारीक झालेले किम जोंग-उन यांना पाहून देशवासियांना अश्रू अनावर झाल्याचे वृत्त दिले होते. दरम्यान अर्थव्यवस्थेला पुन्हा उभारी देण्यासाठी प्रयत्न सुरु असल्यामुळे लोकांचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करण्यासाठी हे सर्व सुरु असल्याचा दावा केला जात आहे.

गुप्तचर यंत्रणांचे किम जोंग-उन यांच्या वजनावर विशेष लक्ष असते. याचे मुख्य कारण म्हणजे उत्तर कोरियामधील निरंकुश आणि गुप्त शासनामध्ये होणारे बदल यावर अवलंबून आहेत. सोबतच त्यांच्या कुटुंबाला किम जोंग-उन यांच्या कुटुंबाला ह्रदयाशी संबंधित आजारांचा आधीपासूनच त्रास आहे. याआधी दक्षिण कोरियाच्या गुप्तचर विभागाने किम जोंग-उन यांचे वजन १४० किलो असल्याचे सांगितले होते. पण यावेळी अतिरिक्त माहिती पुरवण्यात आली नव्हती.

त्याचबरोबर सध्या किम जोंग उन यांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतल्याची चर्चा सुरु आहे. दरम्यान दक्षिण कोरियाच्या अजून एका खासदाराने किम जोंग उन यांनी कोरोना लस घेतल्याचा कोणताही पुरावा नसल्याचे म्हटले आहे.