आरोग्य मंत्रालय सांगते देशातील ५३ टक्के कोरोनाबाधित महाराष्ट्र आणि केरळमध्ये


नवी दिल्ली – देशातील कोरोनाबाधितांची दैनंदिन संख्या ५० हजारांपेक्षा कमी असली तरी धोका अद्याप काय आहे. अजूनही काही भागात कोरोनाची दुसरी लाट असल्याचे आढळून आले आहे. एकट्या महाराष्ट्र आणि केरळमध्ये देशातील निम्म्याहून अधिक रुग्ण असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी सांगितले. आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की केरळचे १४ आणि महाराष्ट्रातील १५ जिल्ह्यांमध्ये चिंताजनक परिस्थिती आहे.

आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव्ह अग्रवाल म्हणाले की कोरोनाची दुसरी लाट अद्याप संपलेली नाही. हा विषाणू अजूनही आहे. अशा परिस्थितीत, आपण निष्काळजीपणाने कोरोना प्रोटोकॉलचे उल्लंघन करणे धोकादायक ठरणार आहे. गेल्या आठवड्यात भारतात आढळून आलेल्या कोरोनाबाधितांपैकी निम्म्याहून अधिक म्हणजेच ५३ टक्के बाधित हे महाराष्ट्र आणि केरळमध्ये आढळले आहेत.

अद्याप कोरोनाचे संकट टळले नसल्याचे केंद्राने शुक्रवारी सांगितले. अजूनही देश दुसऱ्या लाटेसोबत लढत आहे आणि आपल्याला आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे, कारण आपल्याला वाटत आहेत की कोरोना संपला असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. सरकारने पर्यटन स्थळावर होत असलेल्या गर्दीबाबतही भाष्य केले आहे. पर्यटन स्थळावरील परिस्थिती पाहून लोक कोरोना प्रोटोकॉलचे नियम पाळत नसल्याने हे चिंतेचे एक गंभीर कारण आहे आणि त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव पसरण्याचा धोका वाढेल, असे सरकारने म्हटले आहे.

अग्रवाल शुक्रवारी पत्रकार परिषदेत म्हणाले की, देशभरात नवीन बाधितांमध्ये घट होत आहे. गेल्या आठवड्यात कोरोनाच्या नवीन बाधितांमध्ये ८ टक्क्यांनी घट झाली आहे. देशातील ९० जिल्ह्यांमधून ८० टक्के नवीन बाधित समोर येत आहेत. कोरोना नियमावलीचे पालन करण्यावर भर देताना ते म्हणाले की रशिया, बांगलादेश आणि ब्रिटनच्या उदाहरणावरून आपल्याला शिकायला हवे, तिथे रुग्ण संख्या पुन्हा एकदा वाढू लागली आहेत. अग्रवाल म्हणाले की नुकतीच ब्रिटनमध्ये युरो चषक २०२० चे आयोजन करण्यात आले होते आणि लोक फुटबॉल सामन्यांचा आनंद घेत होते. पण तिथे आता पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे.

तिसऱ्या लाटेबाबत अनेक तज्ज्ञांनी भीती व्यक्त केल्यानंतर आरोग्य मंत्रालयाने ही सूचना जारी केली आहे. दरम्यान, देशातील सर्व हिलस्टेशन्स ते बाजारपेठेतील गर्दी होण्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. सध्या कोरोनाच्या नवीन बाधितांची संख्या ५०,००० पेक्षा कमी आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार शुक्रवारी भारतात एकूण ४३,३९३ नवीन कोरोना बाधितांची नोंद झाली आहे.

देशातील एकूण बाधितांची संख्या ३,०७,५२,९५० झाली आहे. आजपर्यंत देशात २,९८,८८,२८४ जण कोरोनातून बरे झाले आहेत. तर ४,०५,९३९ कोरोनाबाधितांचा मृत्यू झालेला आहे. देशातील अॅक्टिव्ह केसेसची संख्या ४,५८,७२७ आहे. आजपर्यंत देशात ३६,८९,९१,२२२ जणांचे लसीकरण झालेले आहे. यापैकी ४०,२३,१७३ जणांचे मागील २४ तासात लसीकरण झालेले आहे.