देशात काल दिवसभरात 43 हजार कोरोनाबाधितांची नोंद, तर 911 जणांचा मृत्यू


नवी दिल्ली : काल दिवसभरात देशात 43,393 नव्या कोरोनाबाधितांची भर पडली आहे, तर 911 बाधितांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासांत 44,291 कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्या आधी गुरुवारी 45,892 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली होती, तर 817 बाधितांचा मृत्यू झाला होता. तसेच 44,291 रुग्ण कोरोनामुक्त झाले होते.

देशात आतापर्यंत 36 कोटी 89 लाख कोरोना प्रतिबंधक डोस देण्यात आले आहेत. गुरुवारी एकाच दिवशी 40 लाख 23 हजार डोस देण्यात आले आहेत. आतापर्यंत 42 कोटी 70 लाख कोरोनाच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. देशातील कोरोनामुळे होणारा मृत्यूदर हा 1.32 टक्के एवढा आहे, तर रिकव्हरी दर हा 97 एवढा आहे. देशातील सक्रिय रुग्णांची संख्या ही 2 टक्क्याहून कमी आहे. कोरोनाच्या सक्रिय रुग्णसंख्येच्या बाबतीत भारताचा जगात चौथा क्रमांक लागतो.

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नव्या कॅबिनेटच्या पहिल्या बैठकीत कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी खास पॅकेजला मंजुरी देण्यात आली आहे. 23 हजार कोटी रुपयांच्या इमर्जन्सी हेल्थ रिस्पॉन्स फंडला मंजुरी देण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या पॅकेजची घोषणा केली होती. त्याला गुरुवारी नव्या कॅबिनेटमध्ये मंजुरी देण्यात आली.

महाराष्ट्रात गुरुवारी 9,114 नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले असून 121 लोकांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.02 टक्के एवढा आहे. गुरुवारी 8,815 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत तर राज्यात आजपर्यंत एकूण 58,89,982 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.05 टक्के एवढे झाले आहे. सध्या राज्यात 6.24 लाख व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 4,572 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.