हे आईसक्रीम खाताच अनुभवता येणार मद्याची धुंदी

आईस्क्रीमचे जगभरात अक्षरशः हजारो प्रकार उपलब्ध आहेत आणि आईस्क्रीम प्रेमी आपापल्या आवडीप्रमाणे त्याचा आस्वाद घेत असतात. पण आईस्क्रीम खाल्ल्यावर मद्यप्राशन केल्याप्रमाणे धुंदी येते हा अनुभव कुणी घेतला नसेल. तो अनुभव आता घेता येणार आहे. हिंक्ले येथील आईस्क्रीम पार्लर चालक विल रोजर्सने त्याच्या डब्ल्यूडीएस डेझर्ट स्टेशन मध्ये हे अजब आईस्क्रीम उपलब्ध केले आहे.

झिरो तपमानाखाली आईस्क्रीम बनविणाऱ्या मशीनच्या सहाय्याने रोजर्स यांनी ही किमया साधली आहे. नवे आईस्क्रीम म्हणजे फ्रीजिंग अल्कोहोल आहे. रोजर्स यांचे स्वतःचे आईस्क्रीम पार्लर असून त्यांनी काही दिवसापूर्वी हाय कॅफेन आईस्क्रीम बनविले होते. हे आईस्क्रीम यशस्वी झाले तेव्हा हीच युक्ती वापरून त्यांनी अल्कोहोल आईस्क्रीम बनविले. या आईस्क्रीमचे पेटंट त्यांनी घेतले आहे.

हे आईस्क्रीम बनविण्यासाठी त्यांनी एनईए जेलचा वापर केला. हे जेल अल्कोहोल मध्ये मिक्स झाल्यावर आईस्क्रीम बनले ते कोन मध्ये भरून खाता येते. ३० मिनिटात हे आईस्क्रीम तयार होते. अल्कोहोलचे प्रमाण जास्त असेल तर थोडा अधिक वेळ लागतो. रोजर्स यांनी हे आईस्क्रीम अनेक कार्यक्रमात सर्व्ह केले आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

हे आईस्क्रीम बनविणारे मशीन बनवून रोजर्स यांनी त्याला एफडीआय कडून मंजुरी घेतली आहे. या मशीनची किंमत ६ हजार डॉलर्स आहे असे समजते. तीन वर्षापूर्वी बझ पॉप कॉकटेल नावाने ताजी फळे आणि अल्कोहोल यापासून बनविलेले आईस्क्रीम बाजारात आले होते असेही समजते.