एसबीआयच्या ४४ कोटी ग्राहकांवर चीनी हॅकर्सची नजर

भारताची सर्वात मोठी बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये ज्या ग्राहकांचे खाते आहे त्यांच्यासाठी एक आवश्यक माहिती जारी केली आहे. एसबीआयच्या ग्राहकांच्या अकौंटवर चीनी हॅकर्सची नजर असून पाहता पाहता ग्राहकांच्या अकौंट मधून पैसे गायब केले जात आहेत. हे हॅकर्स फिशिंग स्कॅमच्या माध्यमातून ग्राहकांना निशाणा बनवीत आहेत. एक विशेष वेबसाईट लिंकचा वापर त्यासाठी केला जात आहे. या लिंक वर ग्राहकाला केवायसी अपडेट केल्यास ५० लाखाचे फ्री गिफ्ट देण्याची ऑफर दिली जात आहे.

सायबर सुरक्षा तज्ञांनी या संदर्भात इशारा दिला असून एक एसएमएस तुमचे बँक अकौंट रिकामे करू शकतो असे म्हटले आहे. हॅकर्स व्हॉटस अप किंवा एसएमएस द्वारा केवायसी अपडेट करण्याविषयी लिहिताना त्यातच एक वेबसाईट लिंक देत आहेत. या लिंक वर क्लिक केले की युजरला एसबीआयच्या बनावट वेबसाईटवर रीडायरेक्ट केले जाते. तेथे कंटीन्यू टू लॉग इन बटणवर क्लिक केले की दुसऱ्या पेजवर कॅप्चा कोड, युजर नेम व पासवर्ड मागितला जातो. तो देताच ग्राहकाची सर्व माहिती हॅकर्स कडे जाते आहे.

हॅकर्स ग्राहकाचा पासवर्ड चेंज करू शकतात आणि ग्राहकाचे बँक खाते रिकामे केले जाते. काही मेसेज मध्ये ५० लाखाचे गिफ्ट आमिष दाखविले जात आहे. दिल्लीच्या सायबर पीस फाउंडेशन व ऑटोबॉट इन्फोसेक प्रा.लिमी.ने या संदर्भात अभ्यास करून संशोधन केले आहे. ज्या वेबसाईटची लिंक कस्टमर्सना दिली जात आहे त्या सर्व डोमेन नेमचे रजिस्ट्रेशन चीन मध्ये केल्याचे त्यात दिसून आले आहे.