Wimbledon 2021: रॉजर फेडररचे 21वे ग्रँडस्लॅम जेतेपदाचे स्वप्न भंगले


नवी दिल्ली : टेनिस स्टार स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररला विम्बल्डन 2021 मध्ये बुधवारी पुरुष एकेरी खुल्या टेनिस स्पर्धेत पराभवाचा सामना करावा लागला. फेडररचा पोलंडच्या हुबर्ट हुर्काझने 6-3, 6-4, 6-4 अशा सरळ सेटमध्ये पराभव केला. फेडरचा पराभव करुन हुर्काझने कारकीर्दीत पहिल्यांदाच ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.

पुढच्या महिन्यात वयाची चाळीशी गाठणारा फेडरर 21वा ग्रँडस्लॅम जेतेपदाचे स्वप्न घेऊनच मैदानावर उतरला होता. परंतु, हुर्काझचेच वर्चस्व संपूर्ण सामन्यात दिसून येत होते. पोलंडच्या 24 वर्षांच्या हर्काझने फेडररचा 6-3, 6-4, 6-4 अशा सरळ सेटमध्ये पराभव करत पहिल्यांदाच ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.

आठ वेळा विम्बल्डनच्या पुरुष एकेरी स्पर्धेचे जेतेपद मिळवणारा रॉजर फेडररला 24 वर्षीय हुर्काझ आदर्श मानतो. पण बुधवारी रंगलेल्या उपांत्यपूर्व सामन्यात हुर्काझने फेडररचा अवघ्या 1 तास 49 मिनिटांत पराभव केला. या पराभवामुळे रॉजर फेडरचे ग्रँडस्लॅम जेतेपदाचं स्वप्न भंगले आहे. सामन्यात पराभव होऊनही चाहत्यांच्या आणि प्रेक्षकांच्या मनात रॉजरनं मानाचं स्थान पटकावल्याचा प्रत्यय कालच्या या सामन्यात आला.

तसेच फेडरर सामना हरल्याबाबत सोशल मीडियावरही चाहत्यांकडून हळहळ व्यक्त होत होती. रॉजरने विम्बल्डनमधील शेवटचा सामना खेळल्याचे संकेत दिल्याची शंका चाहत्यांकडून उपस्थित केली जात आहे. अशातच सामन्यासाठी सेंटर कोर्टवर उपस्थित असलेल्या चाहत्यांकडून फेडररच्या पराभवाबाबत हळहळ व्यक्त केली जात होती. तसेच त्याच्यावर कौतुकाचा वर्षावही होत होता. सामना संपल्यानंतर कोर्टवर उपस्थित असलेल्यांच्या टाळ्यांच्या कडकडाटात फेडरर बाहेर पडला.

तर दुसरीकडे ग्रँडस्लॅम स्पर्धेमधील उपांत्यपूर्व फेरीचा सामना जोकोविचने जिंकला आहे. जोकोविचने हंगेरीच्या मार्टन फुक्सोविक्सचा 6-3, 6-4, 6-4 असा पराभव केला. जोकोविच दहाव्यांदा विम्बल्डनच्या उपांत्य फेरीत पोहोचला आहे. उपांत्य फेरीत जोकोव्हिच-शापोवालोव्ह आमने-सामने येणार आहेत.