घोड्यांवरून प्रवास करण्याची फार पूर्वीपासून असलेली परंपरा काळानुरूप नामशेष होत गेली. पण अद्यापही घोड्यांच्या शर्यती आणि मजा म्हणून घोड्यावरून सवारी केली जाते. पण याच घोड्यांना इतिहास काळात महत्त्वपूर्ण स्थान होते. आजही अनेक भागांमध्ये टांगा वापरला जातो. लग्नातही काही ठिकाणी घोडा किंवा घोडी वापरण्याची परंपरा कायम आहे. पण तुम्हाला माहिती आहे का जगात असा एक घोडा आहे ज्याची उंची सर्वात जास्त आहे. या घोड्याचे नुकतेच निधन झाल्याची बातमी समोर येत आहे.
जगातील सर्वात उंच घोड्याचा मृत्यू झाला असून बिग जेक असे या घोड्याचं नाव होते. तो 20 वर्षांचा होता. हा घोडा बेल्जियम पॉयनेट स्मोकी हॉलो फार्म येथे राहात होता. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्याचे नाव नोंदवले होते. सोशल मीडियावर या घोड्याच्या निधनाची माहिती आल्यानंतर त्याच्या मालकाने घोड्याचा मृत्यू कधी झाला याची तारीख सांगण्यास विरोध दर्शवला आहे.
जेरी गिल्बर्ट यांच्या मते हा एक सुपरस्टार आणि शानदार घोडा होता. नेब्रास्कामध्ये त्याचा जन्म झाला होता. त्यावेळी त्याचे वजन 109 किलोग्रॅम होते. एका सामान्य घोड्यापेक्षा त्याचे वजन त्यावेळी 45 किलोग्रॅम अधिक होते.
आम्ही ती तारीख लक्षात ठेवू इच्छित नाही. ही आमच्या कुटुंबासाठी अत्यंत दु:खद घटना असल्याचे घोड्याचा सांभाळ करणाऱ्या कुटुंबाकडून कळवण्यात आले. बिग जॅक जगातील सर्वात उंच घोडा म्हणून प्रसिद्ध होता पण आता त्याचा मृत्यू झाला आहे. याची उंची 6 फूट 10 इंच एवढी होती. तर त्याचे वजन 2500 पाऊंड म्हणजे 1,236 किलोग्राम होते. त्याची 2010 मध्ये गिनीज वर्ल्ड बूकमध्ये नोंद करण्यात आली होती.