
नवी दिल्ली – काल मोदी सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. अनेक मंत्र्याना यामध्ये डच्चू देण्यात आला. केंद्रीय आरोग्यमंत्रीपदावरून डॉ. हर्षवर्धन यांना काढून टाकण्यात आले. दरम्यान, केंद्रीय आरोग्यमंत्री पदाची जबाबदारी मनसुख मंडाविया यांच्याकडे सोपविली गेली आहे. डॉ. हर्षवर्धन यांच्यावर कोरोना काळात मोठ्या प्रमाणात टीका झाली. त्यांना लसीच्या तुटवड्यामुळे लोकांच्या रोषाचा देखील सामना करावा लागला. दरम्यान, आरोग्यमंत्री बदलल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सवाल केला आहे.
आरोग्यमंत्री बदलल्यानंतर राहुल गांधींचा सवाल; आता लसींची कमतरता भासणार नाही?
ट्विट करत राहुल गांधी सवाल विचारला आहे. याचा अर्थ यापुढे लसीची कमतरता भासणार नाही?, त्याचबरोबर राहुल गांधींनी ‘चेंज’ असा हॅशटॅग दिला आहे. दरम्यान भाजपचे प्रवक्ते गौरव भाटिया यांनी कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी हे ‘बेजबाबदार’ आहेत आणि कोणत्याही कारणाशिवाय टीका करतात, असे म्हणत राहुल गांधींवर पलटवार केला.
देशातील अनेक भागात निर्बंधातून सूट दिल्यानंतर आता कोरोनाबाधितांच्या संख्येत पुन्हा मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे कोरोनाचा कहर अद्याप सुरुच आहे. गेल्या २४ तासांत देशभरात तब्बल ८१७ करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. काही दिवसांपूर्वी ही आकडेवारी ५०० पेक्षा ही कमी होती. पण अचानक मृत्यूंमध्ये वाढ झाल्यामुळे चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे.
आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांमध्ये ४५,८९२ नवीन कोरोनाबाधित आढळून आले आहेत आणि ८१७ रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. बुधवारी दिवसभरात ४४,२९१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
