डेल्टा व्हेरिएंटनंतर आता लॅम्बडा व्हेरिएंटचा धोका; असू शकतो डेल्टा प्लस पेक्षाही अधिक धोकादायक


नवी दिल्ली : कोरोनाच्या भयंकर असलेल्या डेल्टा व्हेरिएंटच्या प्रभावातून आता कुठे जग बाहेर येत असतानाच जगभरात पुन्हा एकदा चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाच्या महाभयंकर अशा लॅम्बडा व्हेरिएंटचा शोध लागला, असून तो डेल्टा प्लस व्हेरिएंटपेक्षाही अधिक धोकादायक असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सध्या जगभरातील 30 देशांमध्ये लॅम्बडा व्हेरिएंटचा प्रसार झाला आहे. पण अद्याप या व्हेरिएंटचा एकही रुग्ण भारतात सापडला नसल्याचे वृत्त आहे.

आफ्रिकेतील पेरु या देशात लॅम्बडा या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा उगम झाल्याचे सांगण्यात येत आहे. C.37 असे नाव या व्हेरिएंटला देण्यात आले असून याचा प्रसार मलेशिया, ब्रिटनसहित 30 देशांमध्ये झाला आहे. पेरु या देशाचा कोरोनामुळे सध्या सर्वाधिक मृत्यू होणाऱ्या प्रमाणाबाबत सर्वात वरचा क्रमांक लागतो. मे आणि जूनमध्ये पेरुमध्ये सापडलेल्या एकूण रुग्णांपैकी 82 टक्के रुग्णांमध्ये लॅम्बडा व्हेरिएंट सापडला असून त्यानंतर याचा प्रादुर्भाव चिली या देशात जास्त आहे.

यासंदर्भात एक निवेदन मलेशियाच्या आरोग्य मंत्रालयाने प्रसिद्ध केले असून त्यामध्ये सांगण्यात आले आहे की, डेल्टा व्हेरिएंटपेक्षाही लॅम्बडा व्हेरिएंटचा प्रसार अधिक वेगाने होऊ शकतो आणि डेल्टाच्या तुलनेत हा व्हेरिएंट अधिक धोकादायक आहे. लॅम्बडा व्हेरिएंटचा प्रसार वेगाने होऊ शकतो आणि कोरोनाच्या लसीमुळे शरीरात निर्माण झालेल्या अॅन्टिबॉडी नष्ट करण्याची क्षमता या व्हेरिएंटमध्ये असल्याचे सांगण्यात येत आहे. या व्हेरिएंटला जागतिक आरोग्य संघटनेने ‘व्हेरिएंट ऑफ इंटरेस्ट’ या प्रकारात टाकले आहे.

या व्हेरिएंटचा भारतात अद्याप एकही रुग्ण सापडला नसल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. पण तरीही या व्हेरिएंटचा संभाव्य धोका लक्षात घेऊन त्यावर उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.