पदभार स्वीकारताच नारायण राणेंनी साधला उद्धव ठाकरेंवर निशाणा


नवी दिल्ली – नारायण राणेंना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या केंद्रीय मंत्रिमंडळात संधी देण्यात आली असून त्यांचा शपथविधी बुधवारी पार पडला. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाची जबाबदारी नारायण राणे याच्याकडे सोपवण्यात आली आहे. दरम्यान आपल्या मंत्रालयाचा पदभार नारायण राणे यांनी स्वीकारला असून यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.

त्यांना उद्धव ठाकरेंनी फोन करुन शुभेच्छा दिल्या का? असे विचारण्यात आल्यानंतर ते म्हणाले की, नाही, त्यांनी शुभेच्छा दिल्या नाहीत. त्यांचे मन एवढे मोठे नाही. पण त्यांनी शुभेच्छा दिल्या नसल्या तरी संपूर्ण महाराष्ट्र आणि जिल्ह्यांमधून मला शुभेच्छा मिळाल्या आहेत, त्या मी त्यांच्या शुभेच्छा समजतो. दरम्यान मला शपथविधीनंतर शरद पवारांनी शुभेच्छा दिल्याची माहिती नारायण राणे यांनी यावेळी दिली.

संजय राऊत यांना काही ना काहीतरी बोलायचेच असते. चांगले नाही वाईटच बोलायचे असते. संजय राऊत यांना सांगेन खाते बरे वाईट नसते, तर काम कसे करतो हे महत्वाचे असते. जेव्हा या खात्याला मी न्याय देईन तेव्हा संजय राऊतच हे खातं चांगले आणि मोठे होते असे म्हणतील, असा टोला नारायण राणे यांनी लगावला.