काल दिवसभरात 45 हजार नव्या कोरोनाबाधितांची नोंद; तर 817 रुग्णांचा मृत्यू


नवी दिल्ली – कोरोनाची दुसरी लाट सध्या ओसरत असली तरी दैनंदिन बाधितांसंख्येत फारशी घट झालेली नाही. आरोग्य मंत्रालयाने नुकत्याच जारी केलेल्या आकडेवारीनुसार, काल दिवसभरात 45,892 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 817 बाधितांचा मृत्यू झाला आहे. तसेच गेल्या 24 तासांत 44,291 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

देशामध्ये आता कोरोनाबाधितांच्या नव्या रुग्णांच्या संख्येत घट होत आहे. देशभरात 7 जुलैपर्यंत 36 कोटी 48 लाख कोरोना लसीचे डोस देण्यात आले आहेत. मंगळवारी दिवसभरात 33 लाख 81 हजार लसीचे डोस देण्यात आले आहेत. तसेच आतापर्यंत जवळपास 42 कोटी 52 लाख कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.

देशात कोरोनामुळे मृत्यूदर 1.30 टक्के आहे. तर रिकव्हरी रेट 97 टक्क्यांहून अधिक आहे. अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 2 टक्क्यांनी घटली आहे. कोरोना अॅक्टिव्ह रुग्णांची संख्येत भारत जगात चौथ्या स्थानी आहे. एकूण कोरोनाबाधितांच्या संख्येत भारत दुसऱ्या स्थानी आहे. तर जगभरात अमेरिका, ब्राझीलनंतर सर्वाधिक मृत्यू भारतात झाले आहेत.

महाराष्ट्रात काल दिवसभरात 9,558 कोरोनाबाधितांची वाढ झाली आहे. आज नवीन 8,899 कोरोनाबाधित बरे झाले आहेत. एकूण 58,81,167 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 1,14,625 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 96.05% झाले आहे.