जपानी पासपोर्ट ठरला जगातील पॉवरफुल पासपोर्ट

दरवर्षी जगभरातील देशांच्या पासपोर्टचे रँकिंग ठरविले जाते आणि त्यानुसार कोणत्या देशाचा पासपोर्ट सर्वात पॉवरफुल आहे त्याची यादी जाहीर केली जाते. त्यानुसार २०२१ सालासाठीचे पासपोर्ट रँकिंग प्रसिद्ध झाले आहे. यंदाच्या वर्षी जपानचा पासपोर्ट जगातील पॉवरफुल पासपोर्ट ठरला आहे. हेनले अँड पार्टनर्सच्या रिपोर्ट नुसार जपानी पासपोर्ट धारक जगातील १९३ देशात विसा मुक्त किंवा विजा ऑन अरायव्हल सुविधा मिळण्यास पात्र आहेत.

या यादीत दोन नंबरवर सिंगापूर, तीन नंबर वर जर्मनी आणि द.कोरिया आहेत. भारताचे या यादीतील स्थान यंदा घसरून ९० वर आले आहे. गेल्या वर्षी भारतीय पासपोर्ट ८४ नंबरवर होता. भारतीय पासपोर्ट धारक जगातील ५८ देशात विना विसा किंवा विसा ऑन अरायव्हल सुविधा मिळविण्यास पात्र आहेत.

या यादीत सात नंबरवर चार देश आहेत. अमेरिका, युके, बेल्जियम व न्यूझीलंड देशांचा त्यात समावेश आहे. २०११ मध्ये चीन ९० नंबरवर होता तो यावर्षी ६८ व्या नंबरवर आला आहे तर युएईने ६५ वरून १५ नंबरवर झेप घेतली आहे. पाकिस्तान शेवटून चार नंबरवर आहे तर शेवटचा नंबर अफगाणिस्थानचा आहे.