‘ट्रॅजिडी किंग’ दिलीपकुमार प्रेमात ठरले होते असफल
दिलीप कुमार यांच्या निधनाने फिल्मी जगतातील एक सोनेरी अध्याय समाप्त झाला आहे. आता राहिल्या त्या आठवणी. ‘ट्रॅजिडी किंग’ दिलीपकुमार यांनी करियर मध्ये अतोनात यश मिळविले पण प्रेमात मात्र ते असफल ठरले होते असे सांगितले जाते. दिलीप कुमार त्यांच्या तीन नायिकांच्या प्रेमात पडले होते पण हे प्रेम सफल होऊ शकले नाही. यातील दोन प्रेमप्रकरणे तर लग्नाच्या पायरी पर्यंत गेली होती मात्र ती अधुरी राहिली.
दिलीप कुमार यांचे पाहिले प्रेम होते अभिनेत्री कामिनी कौशल. शहीद चित्रपटात यांनी एकत्र काम केले आणि दोघेही एकमेकांच्या प्रेमात अडकले. त्यांनी लग्न करायची ठरविले होते. मात्र दुर्दैव असे की कामिनी कौशल, ज्याचे मूळ नाव उमा कश्यप असे होते यांची विवाहित बहिण एकाएकी अपघातात मृत्युमुखी पडली आणि तिच्या दोन लहान मुलींचा सांभाळ व्हावा म्हणून कामिनीच्या कुटुंबाने तिला मेव्हण्याशी लग्न करण्यास भाग पाडले. लग्नानंतर सुद्धा हे प्रेमप्रकरण सुरु होते मात्र घरांच्यानी धमक्या दिल्याने कामिनी आणि दिलीपकुमार एकमेकांपासून वेगळे झाले.
मधुबाला आणि दिलीपकुमार यांच्या प्रेमाची चर्चा जगभर झाली होती. सात वर्षे हे प्रेमप्रकरण सुरु होते. मात्र मधुबालाचे वडील या विरोधात होते. या दोघांचा साखरपुडा सुद्धा झाला होता. पण एका कोर्ट केस मध्ये दिलीप कुमार यांनी मधुबालाच्या वडिलांच्या विरोधात साक्ष दिली आणि तेथून संबंध बिघडले. मधुबाला वडिलांच्या आज्ञेबाहेर नव्हती. त्यातच तिचा अकाली मृत्यू झाला. मधुबालाच्या मृत्यूने दिलीप कुमार डिप्रेशन मध्ये गेले होते.
दिलीप कुमार यांच्या सोबत सहा चित्रपटात झळकलेली अभिनेत्री दाक्षिणात्य सुंदरी वैजयंतीमाला हे दिलीप कुमार यांचे तिसरे प्रेमप्रकरण. हे प्रेमप्रकरण सुद्धा खूप गाजले पण दोघानीही ते नाकारले होते. पण असे सांगतात की चित्रपटात वैजयंतीमाला ज्या साड्या नेसत त्या दिलीप कुमार यांच्या पसंतीच्या असत.
सायराबानो यांच्याबरोबर दिलीपकुमार यांचा विवाह हा तसा धक्कादायक होता. कारण त्या दोघांच्या प्रेमाची चर्चा कधीच नव्हती. सायराबानो दिलीप यांच्यापेक्षा २२ वर्षांनी लहान होत्या. १२ वर्षाच्या असल्यापासून सायरा दिलीप यांच्या चाहत्या होत्या. मधुबालाच्या मृत्युनंतर सायरा यांना दिलीप यांच्या बरोबर चित्रपटात कामाची संधी मिळाली पण दिलीपकुमार यांनी इतक्या लहान मुलीबरोबर काम करण्यास सुरवातीला नकार दिला होता. हा चित्रपट होता झुक गया आसमान. मात्र याच चित्रपटाच्या वेळी दिलीपकुमार यांनी सायराबानो पुढे लग्नाचा प्रस्ताव ठेवला आणि सायरानी तो त्वरित स्वीकारला.
विशेष म्हणजे दिलीपकुमार यांनी आणखीही एक लग्न केले होते. १९८१ मध्ये हैदराबाद येथे भेटलेल्या आस्मा नावाच्या सुंदरीने दिलीपकुमार यांचे दिल जिंकले आणि दिलीपकुमार यांनी सायराबानोला तलाक देऊन आस्माबरोबर निकाह केला. हे लग्न दोन वर्षे टिकले. दिलीप यांना त्यांच्या चुकीची जाणीव झाली आणि त्यांनी परत एकदा सायराबानो यांच्याशी लग्न केले. सायरा यांनी मात्र अखेरपर्यंत दिलीपकुमार यांच्याबरोबरच आपले जीवन जणू बांधून घेतले होते. अखेरपर्यंत त्या दिलीपकुमार यांच्या सोबत राहिल्या.