केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात उदयनराजेंना नाही स्थान! कार्यकर्त्यांमध्ये नाराजी


सातारा – आज अखेर नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आहे. याच पार्श्वभूमीवर, आज सायंकाळी ६ वाजता मोदींच्या मंत्रिमंडळातील नव्या एकूण ४३ मंत्र्यांची नावे जाहीर करण्यात आली. विशेषतः या मंत्रिपदाच्या यादीमध्ये ४ मंत्री हे महाराष्ट्राचे आहेत. दरम्यान एकीकडे महाराष्ट्राचे ४ नेते केंद्रात गेलेले असताना, दुसरीकडे मात्र राष्ट्रवादीची खासदारकी सोडून भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या छत्रपती उदयनराजे भोसलेंना मात्र केंद्रीय मंत्रिमंडळात संधी न देता डावलण्यात आले आहे.

भाजपने मोठ्या प्रयत्नानंतर खासदार उदयनराजे भोसले यांना भाजपमध्ये सामिल करून साताऱ्यात आपली ताकत वाढवली. उदयनराजे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहांच्या उपस्थिती मध्ये भाजपवासी झाले. लोकसभेची पोट निवडणूक पुन्हा लागल्या नंतर साताऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा सुद्धा घेण्यात आली. पण उदयनराजे यांनी घेतलेल्या पक्ष बदलाच्या निर्णयाला सातारच्या जनतेने नाकारल्यामुळे उदायनराजेंचा मोठ्या मतांच्या फरकाने पराभव झाला. या पराभवानंतर देखील त्यांची समजूत काढण्यासाठी त्यांना राज्यसभेची खासदारकी देण्यात आली.

पुढे भविष्यात केंद्रीय मंत्रिमंडळात उदयनराजेंना घेतले जाईल, अशी आशा त्यांच्या राज्यभरातील कार्यकर्त्यांना होती आणि अशा चर्चा ही जोरदार रंगल्या होत्या. पण आज केंद्रीय मंत्रिमंडळाच्या यादीत उदयनराजे भोसले यांना कुठेही स्थान देण्यात आले नसल्याचे चित्र समोर आले आहे. त्यामुळे राज्यातील उदयनराजे भोसले यांच्या कार्यकर्त्यांमध्ये कमालीची नाराजी पसरली आहे.