‘ट्रॅजेडी किंग’चा असा होता बॉलीवूडमधील प्रवास


आज सकाळी ७.३० वाजता हिंदूजा रुग्णालयात ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांची प्राणज्योत वयाच्या ९८ व्या वर्षी मालवली. काही दिवसांपूर्वी त्यांना प्रकृतीच्या कारणास्तव हिंदूजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. याआधी त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यामुळे रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. पण आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली.

दिलीप कुमार यांच्या निधनानंतर बॉलिवूडमधून शोक व्यक्त केला जात आहे. बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावरून दिलीप कुमार यांना श्रद्धांजली वाहिली आहे. श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे दिलीप कुमार यांना ६ जूनला रुग्णालयात भरती करण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली होती. त्यांच्या फुप्फुसात पाणी भरल्याने त्यांची प्रकृती खालावली होती. त्यांच्या फुप्फासातील पाणी काढल्यानंतर त्यांची ऑक्सिजन पातळी देखील वाढू लागली होती. प्रकृतीत सुधारणा पाहून अभिनेते दिलीप कुमार यांना ११ जून रोजी डिस्चार्ज देण्यात आला होता.

पण दिलीप कुमार यांना पुन्हा एकदा श्वास घेण्यासाठी अडचण येत असल्यामुळे ३० जूनला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली आयसीयूमध्ये ठेवण्यात आले होते. ही माहिती दिलीप कुमार यांच्या पत्नी सायरा बानो यांनी दिली होती. अखेर बुधवार ७ जुलैला पहाटे दिलीप कुमार यांची प्राणज्योत मालवली.

११ डिसेंबर १९२२ साली पाकिस्तानमध्ये दिलीप कुमार यांचा जन्म झाला होता. युसूफ खान असे त्यांचे खरे नाव होते. पण बॉलिवूडमध्ये येण्याआधी त्यांनी त्यांचे नाव बदलून दिलीप कुमार असे केले. त्यांनी आपले नाव एका निर्मात्याच्या सांगण्यावरून बदलले होते. त्यानंतर चाहते त्यांना दिलीप कुमार म्हणूनच ओळखू लागले.

नाशिकमध्ये दिलीप कुमार यांचे सुरुवातीचे शिक्षण पार पडलं. त्यानंतर त्यांनी सिनेसृष्टीत येण्याचा निर्णय घेतला. १९४४ मध्ये त्यांनी ‘ज्वार भाटा’ या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केले. सामान्य माणसाच्या आयुष्यातील दुःख दिलीप कुमार यांनी त्यांच्या अभिनयातून उतरवले आणि पुढची अनेक वर्षे रसिकांच्या मनावर अधिराज्य केले. ‘बाबूल’, ‘दीदार’ ‘मुगल-ए-आझम’ , ‘आन’ ‘गंगा-जमुना’, ‘मधुमती’, ‘देवदास’ अशा कितीतरी चित्रपटांची नावे घेता येतील. ‘मुगल-ए-आझम’ या चित्रपटातील सलीम हा तर त्यांनी अजरामर केला. त्यानंतर दारूच्या नशेत आकंठ बुडालेला, आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत पारोचा ध्यास घेतलेला ‘देवदास’ दिलीप कुमार यांनी ज्या तन्मयतेने रंगवला त्याला खरोखरच जवाब नाही.

सिनेसृष्टीतील सेकंड इनिंगमध्येही दिलीप कुमार यांच्या चित्रपटांची घोडदौड सुरुच होती. ‘क्रांती’, ‘विधाता’, ‘शक्ती’, ‘मशाल’, ‘कर्मा’, ‘सौदागर’ असे एकाहून एक सरस चित्रपट दिलीप कुमार यांनी साकारले. त्यातील वेगळेपणा आपल्या अभिनयातून जपला. ‘मशाल’मध्ये तर त्यांनी पत्रकाराची भूमिका साकारली होती. शक्ती या चित्रपटात दोन अभिनय सम्राटांची जुगलबंदी होती. एक होते दिलीप कुमार आणि दुसरे अमिताभ बच्चन. अमिताभ बच्चन यांच्या वडिलांची आणि एका प्रामाणिक पोलीस अधिकाऱ्याची भूमिका दिलीप कुमार यांनी साकारली. हा चित्रपटही चांगलाच चर्चिला गेला होता. १९९८ मध्ये आलेला ‘किला’ हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला.

अभिनय सम्राटाच्या व्यक्तीगत आयुष्यातही काही समस्या होत्या. तराना चित्रपटाचे शूटींग करताना दिलीप कुमार आणि मधुबाला यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. सात वर्षे ते एकमेकांसोबत होते. पण नया दौर चित्रपटाच्या वेळी एका कोर्ट खटल्यामुळे हे नाते संपुष्टात आले. त्यानंतर वयाने २२ वर्षांनी लहान असणाऱ्या सायरा बानो यांच्याशी १९६६ मध्ये विवाह करून दिलीप कुमार यांनी सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला. त्यानंतर त्यांनी हैदराबादच्या सॉलिसिटर आस्मा साहिबा यांच्याशीही १९८१ मध्ये लग्न केले होते. पण त्यांचा दुसरा विवाह फार काळ टिकला नाही. अवघ्या दोन वर्षातच हे दोघेही विभक्त झाले. पण सायरा बानो यांनी दिलीप कुमार यांचा अखेरच्या श्वासापर्यंत त्यांचा साभाळ केला आणि त्यांना साथ दिली.

दिलीप कुमार यांना मिळालेले पुरस्कार हा देखील चर्चेचा विषय आहे. कारण त्यांनी मिळवलेल्या पुरस्कारांची नोंद गिनिज बुकात झाली आहे. ८ फिल्मफेअर पुरस्कार, पद्मभूषण पुरस्कार (१९९१), दादासाहेब फाळके पुरस्कार (१९९४), एनटीआर पुरस्कार (१९९७), पाकिस्तान सरकारतर्फे निशान-ए-इम्तियाझ पुरस्कार (१९९८), जीवनगौरवर पुरस्कार फिल्मफेअर, पद्म विभूषण पुरस्कार (२०१५), सीएनएन आयबीएन जीवन गौरव पुरस्कार (२००९) अशा अनेक पुरस्कारांचा समावेश आहे. फिल्मफेअर पुरस्कारात १९ वेळा नामांकने मिळवणारेही ते एकमेव अभिनेते होते.