‘मिशन इम्पॉसिबल’मध्ये मुख्य भूमिकेत झळकणार तापसी पन्नू


तेलगू सिनेसृष्टीद्वारे आपल्या कारकिर्दीची सुरुवात करणारी अभिनेत्री तापसी पन्नू तिच्या ‘हसीन दिलरुबा’ या चित्रपटामुळे चांगलीच चर्चेत आली आहे. आजवर विविध भूमिका साकारत प्रेक्षकांची तापसीने मोठी पसंती मिळवली आहे. बॉलिवूडमध्ये आपली ओळख निर्माण केल्यानंतर आता पुन्हा एकदा तापसीने आपला मोर्चा तेलगू चित्रपटाकडे वळवला आहे.

तापसीने अभियन क्षेत्रात २०१० सालामध्ये आलेल्या ‘जुम्मान्धी नंदम’ या तेलगू चित्रपटातून पाऊल टाकले होते. त्यानंतर आता तापसी पुन्हा एकदा तेलगू चित्रपट ‘मिशन इम्पॉसिबल’ मध्ये मुख्य भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटाच्या प्रोजेक्टवर तापसीने कामदेखील सुरु केले आहे. ‘मिशन इम्पॉसिबल’ या चित्रपटाच्या सेटवरील तापसीचा एक फोटोदेखील समोर आला आहे.


या चित्रपटाचे निर्माते निरंजन रेड्डी आणि अनवेश रेड्डी असून या चित्रपटाचे दिग्दर्शन स्वरुप RSJ करणार आहेत. या चित्रपटासाठी तापसी चांगलीच उत्सुक आहे. मी गेल्या सात वर्षांपासून अशा कथेच्या शोधात होते, जी मी स्वत: प्रेक्षक म्हणून पाहू शकेन. ‘मिशन इम्पॉसिबल’ असाच एक चित्रपट आहे. या चित्रपटाची उत्कृष्ट कथा आणि मॅट‍िनी एंटरटेंमेन्ट सारखी टीम माझ्यासाठी खूपच महत्वाची आहे. मी फक्त चांगल्या चित्रपटांची निवड करते. हा प्रेक्षकांचा विश्वास कायम ठेवण्याचा माझा प्रयत्न असल्याचे तापसी म्हणाली आहे. या चित्रपटात तापसीसोबतच ऋषभ शेट्टी आणि सुहास झळकणार आहेत. याशिवाय तापसी लवकरच ‘लूप लपेटा’, ‘रश्मि रॉकेट’, ‘दोबारा’ या चित्रपटात झळकणार आहे.