नाशिक ग्रामीण विभागाच्या पोलीस अधिकाऱ्याचे परमबीर सिंगांवर गंभीर आरोप


मुंबई – माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर नाशिक ग्रामीण विभागाच्या एका पोलीस अधिकाऱ्याने गंभीर आरोप केला आहे. परमबीर सिंग यांनी आपण ठाण्यामध्ये कार्यरत असताना आपल्याला आत्महत्येच्या प्रकरणात मुद्दाम गोवल्याचा आरोप या पोलीस अधिकाऱ्याने केला आहे. आपण ट्रॅफिकच्या नियमांचा भंग केलेल्यांवर कारवाई केली, म्हणून सिंग यांनी आपल्याला या प्रकरणात गोवले असा त्याचा आरोप आहे.

पोलीस उपनिरीक्षक श्यामकुमार निपुंगे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि गृहखात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालक संजय पांडे यांना पत्र लिहून तक्रार दिली आहे. त्यांनी या तक्रारीसोबत सिंग यांचे निकटवर्तीय असलेले पोलीस उपअधिक्षक कदम यांचा एक स्टिंग व्हिडिओही पाठवला आहे. या व्हिडिओमध्ये कदम हे निपुंगेला सांगतात की तुला सिंग यांच्या आदेशावरुन आत्महत्या प्रकऱणात अटक करण्यात आली आहे.

कॉन्स्टेबल सुभद्रा पवार आत्महत्या प्रकरणामध्ये २०१८ साली ठाणे गुन्हा शाखेने निपुंगे यांना अटक केली होती. त्यांच्यावर सुभद्रा पवार यांना आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप होता. याबाबत मिड-डेने दिलेल्या वृत्तानुसार, निपुंगे यांनी सांगितले की, सुभद्रा या माझ्या बहिणीसारख्या होत्या. आम्ही बऱ्याचदा एकमेकांशी बोलायचो. ज्या दिवशी त्या गेल्या त्या दिवशी आमचे बऱ्याचदा फोनवर बोलणे झाले म्हणून सिंग यांनी मी त्यांना आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा आरोप माझ्यावर केला. ६ महिने कारागृहात निपुंगे यांनी शिक्षा भोगली आहे.

निपुंगे यांनी सांगितले की, त्यांची बदली जेव्हा ठाण्याच्या वाहतूक विभागात झाली होती, तेव्हा त्यांनी जड वाहनांचे चालक- मालक आणि पोलीस अधिकारी यांच्यातील लागेबांधे उघड कऱण्याचा प्रयत्न केला होता. ते म्हणाले, नारपोली विभागात ज्या वाहतूक पोलिसांना नियुक्त केले जात होते, ते अशा जड वाहनांच्या चालक-मालकांकडून पैसे घ्यायचे आणि रस्त्यावर त्यांना परवानगी नसतानाही त्यांना जाऊ द्यायचे. हे पैसे थेट परमबीर सिंग यांना जात होते. या अधिकाऱ्यांनी आपली बदली या ठिकाणी करुन घेण्यासाठी परमबीर सिंगांना एक कोटी रुपये दिल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

या लोकांवर जेव्हा कारवाई करण्याचा प्रयत्न निपुंगे यांनी केला, तेव्हाच ते परमबीर सिंग यांच्या नजरेत आले आणि म्हणून हेतुपुरस्सर परमबीर सिंगांनी निपुंगे यांना आत्महत्या प्रकरणात गोवले आणि अटक केली. पण, सुभद्रा पवार यांच्या आत्महत्येनंतर त्यांचा होणारा नवरा घटनास्थळी होता. त्याने पोलिसांना सांगितले की सुभद्रा यांनी आत्महत्या केली. पण त्यांच्या प्रियकराने त्यांची हत्या केल्याचे माझ्या सूत्रांनी मला सांगितले आणि पोलीस उपअधीक्षक कदम यांनीही स्टिंग व्हिडिओमध्ये या गोष्टीला दुजोरा दिला आहे. त्यांनी हेही सांगितले की, सुभद्रा यांच्या शवविच्छेदनाचा व्हिडिओ उपलब्ध नाही. ज्या डॉक्टरांच्या गटाने मनसुख हिरेनच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केले, त्यांनीच सुभद्राच्या मृतदेहाचेही केले होते, असे निपुंगे यांनी सांगितले आहे.