ट्रॅजेडी किंग दिलीप कुमार यांना सायरा बानो यांनी पाणावलेल्या डोळ्यांनी दिला अखेरचा निरोप


मुंबई : आज सकाळी ७.३० वाजता प्रदीर्घ आजाराने हिंदी सिनेमासृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचे निधन झाले. ते ९८ वर्षांचे होते. दिलीप कुमार यांच्या पश्चात पत्नी सायरा बानो आहेत. आपल्या अभिनयाच्या जोरावर दिलीप कुमार यांनी हिंदी मनोरंजन सृष्टीमध्ये स्वतःचे असे अढळ स्थान निर्माण केले होते. देवदास, मुगल-ए-आझम यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केलेले दिलीप कुमार अनेकांसाठी आदर्श होते.

गेल्या काही दिवसांपासून दिलीप कुमार यांच्या प्रकृतीमध्ये सातत्याने चढ उतार होत होते. त्यामुळे त्यांना उपचारांसाठी इस्पितळात दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर त्यांची प्रकृती सुधारल्यानंतर त्यांना घरी पाठवण्यात आले होते. परंतू काही दिवसांनंतर त्यांना पुन्हा श्वसनाचा त्रास जाणवू लागल्यामुळे इस्पितळात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू होते, परंतु यावेळी त्यांच्या शरीराने उपचारांना प्रतिसाद दिला नाही. अखेर बुधवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.

दिलीप कुमार यांचे पार्थिव अॅम्ब्युलन्समधून त्यांच्या राहत्या घरी नेण्यात आल्यानंतर घरून त्यांचे पार्थिव थेट स्मशानभूमीत नेण्यात आले. आज संध्याकाळी ५ च्या सुमारास सांताक्रुझ येथील स्मशानभूमीत दिलीप कुमार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. संध्याकाळी ४.३० वाजता दिलीप कुमार यांच्यावर सांताक्रुझ स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांच्या पत्नी सायरा बानो यांनी पाणावलेल्या डोळ्यांनी दिलीप साहेबांना शेवटचा निरोप दिला.