नारायण राणेंनी घेतली कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ


नवी दिल्ली: भाजप नेते नारायण राणे यांनी ‘मै नारायण तातू राणे… ईश्वर की शपथ लेता हूँ की…’ असे म्हणत केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी एका छोटेखानी कार्यक्रमात राणे यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.

राष्ट्रपती भवनात आज सायंकाळी 6 वाजता झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात 43 मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देण्यात आली. 43 मंत्र्यांच्या यादीत नारायण राणे यांचे नाव सर्वात वर होते. त्यामुळे त्यांनी पहिली शपथ घेतली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह सर्वच केंद्रीय मंत्री उपस्थित होते.

सभागृहात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा प्रवेश झाल्यावर शपथविधीला सुरुवात झाली. राष्ट्रपतींनी सर्वात आधी राणेंना मंत्रिपद आणि गोपनीयतेची शपथ दिली. त्यामुळे राणेंना केंद्रात मोठे मंत्रिपद दिले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.