….तर मोदींना सुद्धा आपल्या पदावरुन हटवले पाहिजे – काँग्रेस


नवी दिल्ली – मोदी सरकारचा दुसऱ्या कार्यकाळातील पहिला मंत्रिमंडळ विस्तार आज होत आहे. मंत्र्यांना यामध्ये कामगिरीच्या आधारावर काढून नवीन नेत्यांना संधी दिली जाणार आहे. तर काही मंत्र्यांना पदोन्नती दिली जाईल. दरम्यान केंद्रातील आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांच्या समवेत अनेक बड्या नेत्यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. या पार्श्वभूमीवर जर कामगिरीच्या आधारावर मंत्र्यांना डच्चू दिला जात, असेल तर मोदींना सुद्धा हटवले पाहिजे, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.


काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला म्हणाले, तुम्ही जर इतरांची कामगिरी बघत असाल तर संरक्षणमंत्र्यांनी हटवले पाहिजे. कारण चीनने आपल्या भूमिवर ताबा मिळवला आहे. तसेच गृहमंत्र्यांना देखील हटवले पाहिजे. कारण देशात मॉब लिंचिंग आणि कस्टोडियल मृत्यूसारख्या घटना सामान्य झाल्या आहेत, तसेच नक्षलवाद देखील फोफावत आहे.

धर्मेंद्र प्रधान आणि डॉ. हर्ष वर्धन यांना देखील हटवण्याची मागणी सुरजेवाला यांनी केली होती. तेलाच्या किंमतींवर नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरलेले धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा. तसेच डॉ. हर्ष वर्धन यांनी खराब कोविड व्यवस्थापनामुळे मंत्रीपदाचा राजीनामा द्यायला हवा, असे सुरजेवाला म्हणाले होते. दरम्यान, डॉ. हर्ष वर्धन यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे.