मोदींच्या मंत्रिमंडळातून महाराष्ट्रातील दोन बड्या मंत्र्यांना डच्चू


नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिल्या मंत्रीमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्रीमंडळातील अनेक मंत्र्यांनी एकामागोमाग एक राजीनामे दिले आहेत. विशेष म्हणजे एकीकडे महाराष्ट्रातील नवीन मंत्र्यांना संधी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात असतानाच सध्याच्या मोदींच्या मंत्रीमंडळातील महाराष्ट्रातील दोन राज्यमंत्र्यांनी राजीनामे दिले आहेत.

यामध्ये महाराष्ट्र भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि ग्राहक संरक्षण आणि नागरीपुरवठा खात्याची जबाबदारी असणाऱ्या रावसाहेब दानवे-पाटील यांनी राजीनामा दिला आहे. त्याचबरोबर भाजपचे अकोल्याचे खासदार संजय धोत्रे यांनी सुद्धा आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. राज्यमंत्री धोत्रे यांच्याकडे मनुष्यबळ विकास, दूरसंचार व माहिती तंत्रज्ञान या खात्यांची जबाबदारी होती. याचबरोबर राजीनामा देणाऱ्या मोठ्या नेत्यांमध्ये केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन आणि केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांचाही समावेश आहे.