भोसरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी एकनाथ खडसेंचा जावई गिरीश चौधरींना अटक


मुंबई : भाजपची साथ सोडून राष्ट्रवादीचे घड्याळ हातात बांधलेल्या एकनाथ खडसेंना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मोठा झटका दिला आहे. ईडीने एकनाथ खडसेंचे जावई गिरीश चौधरींना अटक केली आहे. एकनाथ खडसेंचे जावई गिरीश चौधरी हे सध्या भोसरी जमिन घोटाळ्याप्रकरणी ईडीच्या अटकेत आहेत.

महाविकास आघाडीचे नेते आणि त्यांच्या कुटुंबियांच्या मागे गेल्या काही दिवसांपासून ईडीच्या तपासाचा ससेमिरा लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अनिल देशमुख, प्रताप सरनाईक यांच्यानंतर आता एकनाथ खडसेंकडे ईडीने मोर्चा वळवला आहे. भोसरी जमिन घोटाळ्याप्रकरणी एकनाथ खडसेंचे जावई गिरीश चौधरींना ईडीने अटक केली आहे.

गिरीश चौधरी यांना ईडीने काल (मंगळवारी) चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश दिले होते. रात्री उशीरापर्यंत ईडीकडून त्यांची चौकशी सुरु होती. अखेर चौकशी अंति ईडीकडून त्यांच्यावर रात्री उशीरा अटकेची कारवाई करण्यात आली. याप्रकरणी सध्या ईडीकडून तपास सुरु आहे.

महसूल मंत्री असताना एकनाथ खडसे यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत भोसरीत जमीन खरेदी केल्याचा आरोप करण्यात आले आहेत. भाजपचे कमळ सोडून राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ हाती घेतलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंनाही ईडीने नोटीस धाडली होती. भाजप-शिवसेनेच्या सत्तेत महसूलमंत्री पदी असताना भोसरी एमआयडीसीत खरेदी केलेल्या जमिनीचा व्यवहार यानिमित्ताने पुन्हा चर्चेत आला आहे. खडसेंनी पत्नी मंदाकिनी यांच्या नावाने तीन कोटी 75 लाखांना तीन एकर जमिनीचा व्यवहार केला होता.

या व्यवहाराची नोंद पुण्यातील उपनिबंधक कार्यालयात करण्यासाठी 1 कोटी 37 लाख रुपयांची स्टॅम्प ड्युटी ही भरण्यात आली होती. कोलकाता येथील उकानी आणि मंदाकिनी खडसे यांच्यात हा व्यवहार झाल्याचे दाखविण्यात आल्याचा आरोप तक्रारदाराने केला होता. 2014 मध्ये भाजप-शिवसेनेची सत्ता स्थापन झाली आणि एकनाथ खडसेंच्या पदरी महसूल खाते आल्यानंतर 28 एप्रिल 2016 मध्ये खडसेंचा याच भोसरी एमआयडीसीत पत्नीच्या नावे जमीन व्यवहार झाला. पण तत्पूर्वीच येथे अनेक कंपन्याचे काम सुरु होते. मग हा व्यवहार कसा काय झाला? असा प्रश्न 30 मे 2016 साली तक्रारदार हेमंत गावंडेनी उपस्थित केला होता आणि तत्कालीन महसूलमंत्री एकनाथ खडसे अडचणीत आले होते.

याप्रकरणी एकनाथ खडसेंना काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काही सामाजिक संघटनांनी चांगलेच घेरले. परिणामी खडसेंना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. 4 जून 2016 ला एकनाथ खडसेंनी सर्व मंत्री पदाचा राजीनामा दिला. खडसेंकडे त्यावेळी महसूल, कृषी, पशुसंवर्धन, राज्य उत्पादन शुल्क, दुग्धविकास आणि मत्स्यपालन, अल्पसंख्यांक विकास आणि वक्फ मंत्री अशी खाती होती. खडसेंनी राजीनामा देताच तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस यांनी याप्रकरणी न्यायमूर्ती झोटिंग यांची एक सदस्यीय समितीची स्थापना केली.

तीन महिन्यात झोटिंग समितीने अहवाल सादर करणे अपेक्षित होते. फेब्रुवारी 2017मध्ये नागपूरला जाऊन खडसे या समितीसमोर हजरही झाले. पण तरीही अहवाल सादर होण्यात सातत्याने चालढकल सुरूच होती. शेवटी उच्च न्यायालयाने फटकारले आणि एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले होते.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पुणे सत्र न्यायालयात सुनावणी सुरु असतानाच पुरावे आढळून येत नसल्याचे म्हटले होते. दरम्यान 2019 मध्ये सत्ता परिवर्तन झाले आणि अनपेक्षितपणे महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाली. भाजपच्या हातून सत्ता जाण्याला आणि पक्षात माझी मुस्कटदाबी करण्याला एकमेव फडणवीस जबाबदार आहेत, असा ठपका ठेवत खडसेंनी कमळ सोडून हाती राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ घेतले. या प्रवेशाला दोन महिने उलटताच खडसेंना ईडीने नोटीस धाडली होती. आता याचप्रकरणी एकनाथ खडसेंचे जावई गिरीश चौधरींना ईडीने अटक केली आहे.

राष्ट्रवादीत पक्षप्रवेश करताना एकनाथ खडसे म्हणाले होते की, राष्ट्रवादीत जाण्याचा सल्ला दिल्लीतील वरिष्ठांनी दिला. माझ्यावर विनयभंगाचा खटला टाकला, आयुष्याची चार वर्षे वाया घालवली. भूखंडाच्या चौकश्या लावल्या, जयंतराव कोणी किती भूखंड घेतले, आता सांगतो. मी कोणतीही अपेक्षा ठेवली नाही, पक्षाचे काम करत राहणार. भाजप जशी वाढवली त्याच्या दुप्पट वेगाने राष्ट्रवादी वाढवून दाखवणार.

जयंतराव मला बोलले तुम्ही राष्ट्रवादीत आले, तर ईडी बिडी लावतील तर मी बोललो मी सीडी लावीन. समोरासमोर संघर्ष केला, पाठीत खंजीर खुपसला नाही. आयुष्यातील चाळीस वर्षे भाजपमध्ये काम केले. स्वाभाविक आहे जिथे 40 वर्ष राहिलो एकाएकी पक्ष कसा सोडायचा असे वाटत होते. माझी किती मानहानी झाली, छळवणूक झाली हे सांगितले.