एकनाथ खडसेंना जावयाच्या अटकेनंतर ईडीने धाडले समन्स


मुंबई – अंमलबजावणी संचलनालयाने (ईडी) राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना समन्स बजावले आहे. उद्या सकाळी ११ वाजता खडसे यांना हजर राहण्यास सांगितले आहे. यापुर्वी एकनाथ खडसे यांना ईडीने मोठा धक्का दिला आहे. ईडीने आज एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना अटक केली. गिरीश चौधरी यांना पुण्यातील भोसरी येथील जमीन गैरव्यवहार प्रकरणी ईडीकडून सोमवारी सकाळी चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. रात्री उशीरापर्यंत त्यांची चौकशी सुरु होती. यानंतर त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. दरम्यान या पोठोपाठ एकनाथ खडसे यांना देखील ईडीने समन्स बजावले आहे.

याआधी ईडीकडून एकनाथ खडसेंची भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी जानेवारी महिन्यात चौकशी करण्यात आली होती. ईडीने डिसेंबर महिन्यातच माजी भाजप नेते असणारे एकनाथ खडसे यांना चौकशीसाठी हजर होण्यासाठी समन्स बजावले होते. यानंतर एकनाख खडसे यांनी अटकेपासून संरक्षण मिळवण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. आपण भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यामुळे ईडीकडून कारवाई केली जात असल्याचा आरोप एकनाथ खडसे यांनी यावेळी केला होता.

यावेळी एकनाथ खडसे अंमलबजावणी प्रकरण माहिती अहवालानुसार (ECIR) आरोपी नाहीत, पण जर त्यांनी आमच्या प्रश्नांची उत्तरे दिली नाहीत तर अटक केली जाऊ शकते, असे ईडीने स्पष्ट केले होते. २०१८ मध्ये २२ पानांच्या रिपोर्टमध्ये एसीबीने एकनाथ खडसेंनी क्लीन चीट दिली होती. याआधी भाजप-शिवसेनेच्या सत्ताकाळात एकनाथ खडसे राज्याचे महसूल मंत्री होते. जमीन घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी न्यायमूर्ती दिनकर जोतिंग यांच्या अध्यक्षतेखाली न्यायिक आयोग स्थापन करण्यात आली होता.

खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे व जावाई गिरीश चौधरी यांनी २८ एप्रिल २०१६ रोजी भोसरी एमआयडीसी येथील सव्‍‌र्हे क्र. ५२/२ अ ही जमीन अब्बास रसुलभाई उकानी नामक मूळ जमीनमालकाकडून ३.७५ कोटी रुपयांना खरेदी केली. नोंदणी निबंधकांच्या कार्यालयात या व्यवहाराची रीतसर नोंद केली. अशा प्रकारे एमआयडीसीच्या ताब्यात असलेल्या व त्यांच्या मालकीच्या जमिनीचे खडसे कुटुंबीय सरकारी कागदोपत्री मालक झाले.

खडसे यांच्या म्हणण्यानुसार ‘मूळ जमीनमालकाने संपादित जमिनीचा मोबदला आधीपावेतो घेतला नसल्याने व भूसंपादन प्रक्रिया व्यपगत झाल्याने तोच आजही जमीनमालक आहे व तो ‘ती’ जमीन कुणालाही विकू शकतो. म्हणून आपणही त्याच्याकडून अशी जमीन घेऊ शकतो. त्यात बेकायदेशीर काही नाही.