भास्कर जाधव यांनी मला आईवरुन शिवी दिली; चंद्रकांत पाटलांचा आरोप


मुंबई – विरोधक आणि सत्ताधारी विधिमंडळाच्या दोन दिवसीय पावसाळी अधिवेशनात अनेक मुद्द्यांवरुन आमने-सामने आले. दरम्यान भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन करण्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सध्या आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. ओबीसी आरक्षणाच्या ठरावावर चर्चा सुरू असताना काही सदस्यांनी सभागृहात गदारोळ केला. विरोधी सदस्य आत घुसले त्यांनी मला आई-बहिणीवरून शिव्या दिल्या, असे म्हणत विरोधकांना तालिका सदस्य भास्कर जाधव यांनी सुनावले होते. त्यातच आता एबीपी माझाशी बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भास्कर जाधव यांनी आईवरुन शिवी दिल्याचा आरोप केला आहे.

आईवरुन भास्कर जाधव यांनी शिवी दिली. आमच्या कार्यकर्त्याने काही म्हटले असेल तर ते सरकारला म्हटले असेल. सरकार हरामखोर वैगेरे…पण भास्कर जाधव यांना तुम्ही असे कोणी म्हटले नाही. पण भास्कर जाधव यांनी आईवरुन शिवी दिली, असा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

एवढ्या लवकर हिंदूह्रदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचे चिरंजीव पवारांसारखे बोलायचे एक आणि करायचे एक होतील असे माझ्यासारख्या व्यक्तीने अपेक्षित केले नव्हते, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरेंच्या युतीसंबंधी वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना लगावला.

शरमेने मान खाली घालण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. त्याच्यासाठी पण मान शरमेने खाली गेली पाहिजे. यांच्यासोबत आपण लढलो, त्यांच्याबरोबर शपथा घेतल्या, मोदींच्या प्रतिमेचा वापर केला आणि काही संबंध नाही असे म्हणून गेलात, त्यानेही मान शरमेने घातली पाहिजे, असे चंद्रकांत पाटील यांनी यावेळी शिवसेनेला सुनावले.

निलंबन केलेल्या आमदाराचा विश्वासदर्शक ठरावाचा आणि अध्यक्ष निवडणुकीतील मताचा अधिकार निलंबनामुळे जात नाही. हे एवढे का घाबरत आहेत…१७० जण आहात ना, असे सांगत चंद्रकांत पाटील यांनी विधानसभा अध्यक्ष निवडणुकीसाठी गुप्त मतदान घ्या, असे आव्हानच दिले आहे. नियमांत बदल केला तर न्यायालयातून स्थगिती आणू, असा इशाराही यावेळी त्यांनी दिली.