सिंहामध्ये सर्वप्रथम भारतात सापडले करोना डेल्टा व्हेरीयंट

करोनाचे डेल्टा व्हेरीयंट माणसांप्रमाणे प्राण्यांसाठी सुद्धा जीवघेणे ठरले असल्याचे दिसून आले आहे. प्राण्यांमध्ये डेल्टा व्हेरीयंट सर्वप्रथम भारतात आशियाई सिंहामध्ये आढळले आहे. चेन्नईच्या अरीग्णार अण्णा झु मध्ये प्रथमच ९ आशियाई सिंहामध्ये डेल्टा व्हेरीयंट असल्याचे सिंहांच्या जीनोम सिक्वेन्सिंग मध्ये दिसून आले. करोना संक्रमित एकूण ११ सिहांपैकी दोन सिंह मृत्युमुखी पडले आहेत.

अमेरिका, स्पेन शिवाय चेक गणराज्यात सिंह करोना संक्रमित झाल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र त्या सिंहात करोना अल्फा व्हेरीयंट सापडले होते. डेल्टा जगात भारतात प्रथम सापडले आहे. मेडिकल जर्नल बायोरेक्सीव मध्ये प्रकाशित संशोधनानुसार सर्व सिंहांचे नमुने जीनोम सिक्वेन्सिंग साठी भोपाळच्या राष्ट्रीय उच्च पशु संस्थेकडे पाठविले गेले होते. त्यात ११ पैकी ९ सिंहांच्या नमुन्यात डेल्टा व्हेरीयंट मिळाले आहे. हे सर्व सिंह मे महिन्यात संक्रमित झाले होते त्यातील दोन मृत्यू पावले आहेत.

करोना संसर्ग झालेल्या सिंहांमध्ये भूक नसणे, नाकातून रक्त येणे, खोकला अशी लक्षणे दिसली होती. करोनाचे डेल्टा व्हेरीयंट महाराष्ट्रात सर्वप्रथम दिसले होते. आता जगातील ८४ देशात त्याचा प्रसार झाला असून डेल्टा प्लसचा प्रसार १४ देशात झाला आहे. हे व्हेरीयंट प्रतिजैविकांवर हल्ला करते आणि लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या लोकांना सुद्धा त्याचा संसर्ग होतो असे दिसून आले आहे. हे व्हेरीयंट अतिशय वेगाने पसरते असेही दिसून आले आहे.