मृत्यूची तारीख सांगणारा कॅल्क्युलेटर

जगात सर्वात शाश्वत सत्य कोणते असेल तर ते मृत्यू हेच आहे. जन्माला आलेला प्रत्येक जीव कधी ना कधी मरणार हे नक्की आहे. पण कुणाच्या आयुष्याचा शेवट कुठल्या दिवशी आहे हे मात्र सांगणे शक्य नाही. हे विधान लवकरच खोटे ठरेल अशी शक्यता निर्माण झाली आहे. संशोधकांनी असे एक मशीन तयार केले आहे जे अगोदरच माणसाला त्याच्या मृत्यूची तारीख सांगू शकेल. मरणाची तारीख अगोदरच माहिती झाल्यामुळे माणसाला त्याचे उरलेले आयुष्य मनासारखे जगण्याची संधी मिळेल असा दावा केला जात आहे.

संशोधकांनी बाजारात असा कॅल्क्युलेटर लाँच केला आहे. रिस्क इव्हॅल्युएशन सपोर्टः प्रेडिक्शन फॉर एल्डर लाईफ इन कम्युनिटी टूल (RESPECT) असे या संशोधनाचे नाव असून जगातील अर्ध्या वयोवृद्धांचा डेटा त्यात फीड केला गेला आहे. आयुष्याची सरासरी पाहून मरणाची तारीख ठरविली गेली आहे. अगदी चार आठवड्यात मृत्यू होणार असेल तरी त्याची तारीख यात मिळू शकते.

२०१३ पासून यावर संशोधन केले जात होते. २०१७ पर्यंत ५ लाख लोकांच्या वैद्यकीय स्थितीचे डीटेल्स यात दिले गेले आहेत. पाच वर्षात मृत्यू येणार अशी परिस्थिती असलेल्या वृद्धांच्या डेटा आधारावर हे संशोधन केले गेले. त्याआधारे काही गणिते मांडली गेली.

यात संशोधकांना असे आढळले की आजारी पडल्यावर व्यक्तीची शारीरिक क्षमता घटते आणि त्याचा मरणाशी संबंध आहे. शरीराच्या विविध भागांवर सूज येणे, वजन कमी होणे, भूक कमी लागणे ही मृत्यूची लक्षणे आहेत. कॅनडा मधील ओटावा विद्यापीठ व बृचे रे रिसर्च इन्स्टिट्यूट मधील डॉ. एमी यांनी हे संशोधन केले. मृत्यूची तारीख अगोदर समजली तर माणूस शेवटचे दिवस आनंदात घालविण्याचा प्रयत्न करेल असा त्यामागे विचार होता. हा रिपोर्ट कॅनडा मेडिकल असोसिएशन जर्नल मध्ये छापून आला आहे.