‘ट्रॅजिडी किंग’ दिलीपकुमार यांचे देहावसान

हिंदी सिनेमातील दिग्गज कलाकार आणि ‘ट्रॅजिडी किंग’ अशी ओळख मिळविलेले लोकप्रिय अभिनेते दिलीपकुमार यांचे मुंबईच्या हिंदुजा रुग्णालयात बुधवारी सकाळी साडेसातच्या सुमारास निधन झाले. ते ९८ वर्षांचे होते. श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केले होते तेथे सकाळी त्यांची प्राणज्योत मावळली. दिलीप कुमार यांचा दफनविधी सायंकाळी ५ वा. जुहू येथील कबरस्तानात होणार असल्याचे ट्विटर वरून कळविले गेले आहे. दिलीप कुमार यांच्या मागे पत्नी, अभिनेत्री सायराबानो आहेत. दिलीपकुमार यांच्या निधनाची वार्ता समजताच फिल्म इंडस्ट्री मध्ये शोकाची लहर पसरली असून सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहिली जात आहे.

११ डिसेंबर १९२२ साली पाकिस्तानात जन्मलेल्या दिलीपकुमार यांचे मूळ नाव युसुफखान. नाशिक येथे त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले होते. तेव्हाच त्यांनी अभिनयात करियर करण्याचे ठरविले होते. सिनेसृष्टी मध्ये त्यांनी दिलीपकुमार याच नावाने अफाट लोकप्रियता मिळविली. १९४४ साली ज्वारभाटा मधून त्यांनी सिनेमात पाउल टाकले पण सुरवातीचे त्यांचे चित्रपट फार चालले नाहीत. नूरजहान बरोबर त्यांची जोडी हिट झाली होती. जुगनु हा त्याचा पहिला हिट झालेला चित्रपट.

त्यानंतर दिलीपकुमार यांनी अनेक हिट चित्रपट दिले. मुगले आझम त्यांचा सर्वाधिक कमाई करणारा आणि निर्मितीसाठी सर्वाधिक खर्च झालेला चित्रपट होता. या चित्रपटाने अनेक रेकॉर्ड केली. दिलीपकुमार यांना ८ फिल्मफेअर पारितोषिके मिळाली आहेत. सर्वाधिक अॅवॉर्ड मिळविल्याची नोंद गिनीज बुक मध्ये दिलीपकुमार यांच्या नावावर आहे.

१९९१ साली त्यांना पद्मभूषण आणि २०१५ मध्ये त्यांना पद्मविभूषण सन्मानाने गौरविले गेले होते. १९९४ मध्ये त्यांना दादासाहेब फाळके पारितोषिक दिले गेले. २००० ते २००६ या काळात ते राज्यसभा सदस्य होते. १९९८ मध्ये पाकिस्तान सरकारने ‘ निशान ए इम्तियाज’ या पाकिस्तानातील सर्वोच्च नागरी सन्मानाने त्यांना गौरवले होते.