‘कॅप्टन कूल’ झाला चाळीशीचा

टीम इंडियाचा ‘कॅप्टन कूल’ महेंद्रसिंग धोनी याने ७ जुलैला वयाची चाळीस वर्षे पूर्ण केली. त्यानिमित्त त्याच्यावर जगभरातून अभिनंदन आणि शुभेच्छा वर्षाव होत आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये यशस्वी कप्तान म्हणून ओळख मिळविलेल्या धोनीने अनेक खास रेकॉर्ड नोंदविली आहेत. आयसीसीच्या तीन ट्रॉफी जिंकणारा तो एकमेव कप्तान आहे. भारताने २००७ मध्ये टी २० वर्ल्ड कप, २०११ मध्ये दुसऱ्या वेळी वर्ल्ड कप आणि २०१३ मध्ये चँपियन्स ट्रॉफी धोनीच्या नेतृत्वाखाली जिंकली आहे.

१५ ऑगस्ट २०२० मध्ये धोनीने अचानक आंतरराष्ट्रीय क्रिकेट संन्यास घेत असल्याची घोषणा केली होती. त्यापूर्वी २०१४ मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर कसोटी संन्यास घेतल्याची घोषणा त्याने केली होती. धोनीने शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना जुलै २०१९ मध्ये न्यूझीलंड विरुद्ध विश्वकप सेमी फायनल मध्ये खेळला त्यात भारताचा पराभव झाला होता.

विकेटकीपिंग करताना विजेच्या वेगाने स्टंपिंग करणाऱ्या धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये सर्वाधिक १९२ खेळाडू स्टंपिंगने बाद केले आहेत. त्यात कसोटी मध्ये ३८, वनडे मध्ये १२० आणि टी २० मध्ये ३४ स्टंपिंग समाविष्ट आहेत. वनडे मध्ये सातव्या क्रमांकावर येऊन शतक करणारा तो एकमेव कप्तान आहे. वनडे आणि टेस्ट मधले पाहिले शतक त्याने पाकिस्तान विरोधात केले आहे. विकेटकिपर फलंदाज म्हणून त्याचा सर्वोच्च स्कोर ३१ ऑक्टोबर २००५ मध्ये श्रीलंकेविरुद्ध जयपूर येथे झालेल्या सामन्यात नाबाद १८३ असा आहे आणि त्यात १५ चौके, १० छक्के आहेत.

त्याने भारतातर्फे सर्वाधिक सामन्यात कप्तानी केली असून टीम इंडियासाठी ६० कसोटी, २०० वनडे आणि ७२ टी २० आंतरराष्ट्रीय सामन्यात नेतृत्व केले आहे. हेलीकॉप्टर शॉट धोनीचा खास शॉट म्हणून ओळखला जातो.