ही आहेत जगातील महाग द्राक्षे
महाग आंबे, टरबूजे अश्या फळांविषयी अनेकदा माहिती येते मात्र महाग द्राक्षे या विषयी फारसे माहिती नसते. मुळात द्राक्ष हे तसे छोटे फळ. एका द्राक्षाची किंमत भारतीय चलनात ३५ हजार रुपये आहे हे सांगून सुद्धा खरे वाटणार नाही. पण खरोखरच अशी महाग द्राक्षे जपान मध्ये पिकविली जातात. त्यांच्या एका घडासाठी साडेसात लाखापर्यंत किंमत मोजली जाते. ‘रुबी रोमन’ या नावाने ही द्राक्षे जपानच्या पहाडी भागात विशेष काळजी काट्याने पिकविली जातात. या द्राक्षांचा रंग डाळिंबी किंवा गुलाबी असतो.
सर्वसाधारण द्राक्षांच्या एका घडात ७० -८० द्राक्षे सहज असतात. पण रुबी रोमनच्या एका घडात २४ ते २५ द्राक्षे येतात. सर्वसाधारण द्राक्षाचे वजन ३ ते ५ ग्राम असते तर रुबी रोमन १५ ते २० ग्राम वजनाची असतात. हे द्राक्ष अतिशय मधुर आणि गोड चवीचे असते. दरवर्षी साधारण २४०० ते २५०० घडांचेच उत्पादन घेतले जाते. करण प्रत्येक द्राक्ष गुणवत्तेत उत्तम असावे म्हणून सतत तपासणी करून कमी गुणवत्तेची द्राक्षे तोडून टाकली जातात. जी द्राक्षे निवडली जातात, त्यावर सर्टिफिकेशन सेल ठेवला जातो. या द्राक्षांच्या विक्रीचे नियम अतिशय कडक आहेत.
काही द्राक्षे ३ सेंटीमीटर आकाराची तर काही पिंगपोंग बॉलच्या आकाराची असतात. जपान मध्ये या द्राक्षांना खूप मागणी आहे. या गुणवत्तेचे द्राक्ष निर्माण होण्यासाठी संशोधकांनी सतत १४ वर्षे संशोधन केले असे समजते. २००८ मध्ये या द्राक्षाची प्रथम प्रीमियर द्राक्ष म्हणून ओळख झाली असे सांगितले जाते.