भोलेनाथ नगरी वाराणसी मध्ये मोक्षदायिनी पवित्र गंगा नदीचा करोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. बनारस हिंदू विद्यापीठ व लखनौच्या बीरबल सहानी पुराविज्ञान इन्स्टिट्यूटने संयुक्तपणे केलेल्या संशोधनात गंगेमध्ये करोना विषाणू नसल्याचे दिसून आले.
भारतात करोनाच्या दुसऱ्या लाटेत बिहार, उत्तर प्रदेश मध्ये गंगेत सोडलेली अनेक प्रेते मिळाली होती. त्यामुळे गंगेकिनारी राहणाऱ्या नागरिकांना आचमन किंवा गंगा स्नान केल्यामुळे करोना संसर्ग होईल अशी भीती व्यक्त केली जात होती. त्यामुळे बनारस हिंदू विद्यापीठ वैज्ञानिकांनी चार आठवडे वाराणसी मधील विविध ठिकाणी गंगाजल नमुने गोळा केले आणि लखनौच्या बीरबल सहानी पुराविज्ञान इन्स्टिट्यूट मध्ये डॉ. नीरज राय यांनी या पाण्याच्या आरटीपीसीआर टेस्ट सतत महिनाभर केल्या. याच वेळी गोमती नदीच्या पाण्याच्या टेस्ट सुद्धा केल्या जात होत्या.
गोमती नदीच्या करोना चाचण्या पॉझिटिव्ह आल्या मात्र गंगाजलाच्या चाचण्या निगेटिव्ह आल्या. गंगेचे वाहते पाणी आणि साठलेले पाणी अश्या दोन्ही ठिकाणच्या पाण्याचा टेस्ट केल्या गेल्या असे समजते. प्रो. ज्ञानेश्वर चौबे म्हणाले दोन्ही ठिकाणच्या पाण्याच्या टेस्ट निगेटिव्ह आल्या. गंगेत मुळातच अनेक प्रकारचे जीवाणू सापडतात. त्यामुळे या पाण्याला विषाणू नष्ट करण्याची क्षमता लाभली आहे. गंगाजल अँटीव्हायरल असल्याचे यापूर्वीच सिद्ध झाले आहे.