आता सरकारी लसीकरण केंद्रावर लवकरच मोफत मिळणार स्पुटनिक व्ही लस


नवी दिल्ली : गेल्या दीड वर्षापासून थैमान घातलेल्या कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी देशात सध्या लसीकरण मोहीम वेगाने सुरू आहे. आतापर्यंत कोरोना प्रतिबंधक लसींचे 34 कोटींहून अधिक डोस देऊन झाले आहेत. जुलै महिन्याअखेरपर्यंत आणखी 12 ते 16 कोटी डोसेस दिले जाणार आहेत. आता लसीकरणाचा हा वेग आणखी वाढण्यास मदत होणार आहे. कारण रशियाची स्पुटनिक व्ही ही लसदेखील आता सरकारी लसीकरण केंद्रांवर मोफत उपलब्ध केली जाणार आहे. सध्या कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन लसीच लसीकरण केंद्रांवर दिल्या जात आहेत. तसेच, स्पुटनिक व्ही ही लस केवळ खासगी लसीकरण केंद्रांवर सशुल्क दिली जात आहे. आता ही लसदेखील आता सरकारी लसीकरण केंद्रांवर उपलब्ध केली जाणार असल्यामुळे लसीकरणाचा वेग वाढण्यास मदत होणार आहे.

ही माहिती केंद्र सरकारच्या कोविड-19 वर्किंग ग्रुपचे प्रमुख डॉ. एन. के. अरोरा यांनी ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिली. सध्या स्पुटनिक व्ही ही लस आयात केली जात असून, लवकरच या लसीचे उत्पादन भारतात केले जाणार आहे. या लसीच्या पुरवठ्यानुसार सरकारी लसीकरण केंद्रांवर ही लस लवकरच मोफत उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे डॉ. अरोरा यांनी सांगितले.

स्पुटनिक व्ही या लशीच्या साठवणुकीसाठी उणे 18 अंश सेल्सिअस तापमानाची गरज असते. पोलिओ लसींची साठवणूक ज्यात केली जाते, त्या कोल्डचेन सुविधांमध्ये स्पुटनिक व्ही लसीची साठवणूक करता येऊ शकते. या नियोजनामुळे ही लस गावोगावी पोहोचू शकेल, असेही डॉ. अरोरा यांनी ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला सांगितले.

भारतात सध्या दररोज सरासरी सुमारे 50 लाख जणांचे लसीकरण करण्यात येत आहे. ऑक्सफर्ड-अॅस्ट्राजेनेकाने विकसित केलेली आणि भारतात सिरम इन्स्टिट्यूटमध्ये निर्मिती केली जाणारी कोव्हिशिल्ड आणि हैदराबादच्या भारत बायोटेकने विकसित केलेली पूर्णतः स्वदेशी कोव्हॅक्सिन या दोन लसींचा सध्याच्या लसीकरण मोहिमेत मोठा वाटा आहे. या लसींचे उत्पादन वाढवण्याचे नियोजन आहे. तसेच, आता स्पुटनिक व्ही ही लसदेखील सरकारी लसीकरण कार्यक्रमात उपलब्ध केली जाणार आहे. त्याशिवाय मॉडर्ना आणि झायडस कॅडिला या दोन कंपन्यांच्या लसींनाही लवकरच मंजुरी मिळण्याची अपेक्षा असल्यामुळे आगामी काही आठवड्यांत रोजच्या लसीकरणाची संख्या 80 लाख ते एक कोटीपर्यंत जाऊ शकते, असे डॉ. अरोरा यांनी सांगितले.

‘इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च’ने (ICMR) अलीकडेच जाहीर केलेल्या अहवालानुसार, कोरोना संसर्गाची तिसरी लाट 2022च्या फेब्रुवारी ते मार्च महिन्यात येऊ शकते. त्या पार्श्वभूमीवर, चालू वर्षाअखेरीपर्यंत 18 वर्षांवरील सर्वांचे म्हणजेच सुमारे 93 कोटी लोकसंख्येचे लसीकरण पूर्ण करण्याचं उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे. जुलै महिन्याअखेरीपर्यंत 50 कोटी डोस पूर्ण करण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवले होते. सध्या लसीकरणाच्या आकड्याने 34 कोटींचा टप्पा पार केला असून, चालू महिन्याच्या उर्वरित दिवसांत ते उद्दिष्ट साध्य होऊ शकते, असे डॉ. अरोरा म्हणाले.