आयसीसी क्रमवारीत मिताली राज झाली अव्वल स्थानी विराजमान


नवी दिल्ली – इंग्लंड दौऱ्यावर एकदिवसीय मालिकेत भारतीय महिला संघाला 2-1 असा पराभव पत्करावा लागला. आयसीसीने या मालिकेनंतर ताजी महिला क्रिकेटपटूंची एकदिवसीय क्रमवारी जाहीर केली असून भारताची स्टार कर्णधार मिताली राजने या क्रमवारीत गरुडझेप घेतली आणि अव्वल स्थानी विराजमान झाली. इंग्लंड महिला संघाविरुद्ध तीन सामन्यांच्या मालिकेत मितालीने अनुक्रमे 72, 59 आणि 75 नाबाद धावांची खेळी केली. यासह आयसीसी क्रमवारीत मुसंडी मारत तिने पहिले स्थान पटकावले आहे. तब्बल 762 गुणांसह राज पहिल्या स्थानी विराजमान झाली आहे. मितालीने यादरम्यान दक्षिण आफ्रिकेच्या लिझेल ली हिला दुसऱ्या स्थानावर ढकलले.

आयसीसी क्रमवारी इंग्लंडची टॅमी ब्यूमॉन्ट आणि वेस्ट इंडिजच्या स्टेफनी टेलर यांची घसरण झाली आहे. ब्यूमॉन्ट चौथ्या तर टेलर पाचव्या स्थानावर घसरली आहे. तसेच टॉप-10 महिला फलंदाजांबद्दल बोलायचे तर पहिल्या दहा खेळाडूंच्या यादीत मितालीसोबत टीम इंडियाची सलामी फलंदाज स्मृती मंधानाचा देखील समावेश आहे. स्मृतीने इंग्लंडविरुद्ध तिसऱ्या व अखेरच्या एकदिवसीय सामन्यात 49 धावांचे योगदान दिले होते. स्मृतीने 701 गुण असून तिने नववे स्थान काबीज केले आहे. दुसरीकडे, अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत भारताची दीप्ती शर्माला पाचव्या स्थानावर धक्का देत स्टेफनी टेलर चौथ्या स्थानी विराजमान झाली आहे. शिवाय, दिग्गज वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामीचे गोलंदाजांच्या टॉप-5 मधील स्थान कायम आहे.


नुकतीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 38 वर्षीय मितालीने 21 वर्ष पूर्ण केली. सर्वाधिक वर्ष भारतीय क्रिकेट खेळणारी पहिली तर मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरनंतर दुसरी खेळाडू ठरली. सचिनने 24 वर्षाच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीनंतर 2013 मध्ये निवृत्ती जाहीर केली होती. 1999 मध्ये मितालीने आयर्लंडविरुद्ध सामन्यातून आंतरराष्ट्रीय प्रवास सुरु केला होता. दोन दशकाहून अधिक काळात मितालीने भारतीय क्रिकेटला एक वेगळी उंची मिळवून दिली आहे. नुकतेच इंग्लंड दौऱ्यावरील एकदिवसीय मालिकेत राज आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमध्ये 10,000 धावांचा पल्ला गाठणारी भारताची पहिली तर माजी ब्रिटिश क्रिकेटर चार्लट एडवर्ड्स हिच्यानंतर दुसरी महिला क्रिकेटपटू ठरली.