काँग्रेसचा ‘हात’ सोडून भाजपमध्ये प्रवेश करणार कृपाशंकर सिंह


मुंबई : राज्याचे माजी गृह राज्यमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते कृपाशंकर सिंह हे बुधवारी म्हणजे उद्या 7 जुलै रोजी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. उद्या विधानसभा विरोधी पक्षनेता देंवेद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांच्या उपस्थितीत कृपाशंकर सिंह हे भाजप प्रवेश करणार आहेत. मुंबईत 2022 मध्ये महापालिकेच्या निवडणुका आहेत. या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेससाठी हा मोठा झटका समजला जात आहे.

कृपाशंकर सिंह यांचा स्वत:चा असा मतदारवर्ग आहे. तसेच ते मुळचे उत्तर भारतीय असल्यामुळे त्याचा फायदा थेट हा भाजपला होणार आहे. याचा फायदा भाजपला मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत होऊ शकतो. मुंबईत एकूण 40 ते 50 लाख उत्तर भारतीय मतदार आहेत. हाच आकडा एकूण टक्केवारीपैकी 25 टक्के एवढा असल्यामुळे उत्तर भारतीय मतदार कृपाशंकर सिंह यांच्या भाजप प्रवेशानंतर पाठीशी राहणार की काँग्रेसलाच साथ देणार, हे येत्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत कळेल.

काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांपैकी एक कृपाशंकर सिंह हे आहेत. कृपाशंकर यांच्यामुळे काँग्रेसला आतापर्यंत उत्तर भारतीयांची मते मिळाली आहेत. कृपाशंकर हे 2004 मध्ये राज्यमंत्रीपदी होते. तसेच 2009 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांना घवघवीत यश मिळाले होते. कृपाशंकर यांनी आतापर्यंत मुंबई काँग्रेस अध्यक्ष, आमदार, राज्यमंत्री यासारख्या महत्वाच्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या आहेत.