मुंबई : पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही भाजपच्या आमदारांनी तुफान राडा घातला आहे. भाजपकडून विधानभवनाच्या बाहेर आंदोलन सुरू आहे. तर दुसरीकडे बडनेराचे आमदार रवी राणा यांनी विधानसभा अध्यक्षांच्या समोरील राजदंड पळवून नेल्याचा प्रकार घडला आहे.
बडनेराचे आमदार रवी राणा यांनी पळवला राजदंड
विधानभवनाच्या पायऱ्यांवर भाजपचे आमदार आंदोलन करत असताना बडनेराचे आमदार रवी राणा यांनी सभागृहात काळा बोर्ड घेऊन महाविकास आघाडी सरकारविरोधात घोषणाबाजी करत विधानसभा तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांच्याकडे धाव घेतली. त्यानंतर राजदंड घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी भास्कर जाधव आणि रवी राणा यांच्यामध्ये बाचाबाची झाली. मार्शलला बोलावून भास्कर जाधव यांनी रवी राणा यांना बाहेर काढण्याचे आदेश दिले.
राजदंड पळवण्यात आल्यानंतर सभागृहाचे कामकाज थांबवण्यात आले नाही. कामकाज सुरूच ठेवण्यात आले होते. तर दुसरीकडे, भाजपच्या आमदारांनी आज सभागृहात न जाता विधानभवनाच्या पायऱ्यांवर ठिय्या मांडला होता. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपच्या सर्व आमदारांनी पायऱ्यांवरच सभा भरवली होती. कालीदास कोळंबकर यांना या विधानसभेचे अध्यक्ष करण्यात आले होते. यावेळी भाजपच्या आमदारांनी माईक घेऊन भाषण देण्यास सुरुवात केली होती.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसून आंदोलन करावे, मात्र माईकाचा वापर करणे योग्य नाही, असा आक्षेप राष्ट्रावादीचे नेते जयंत पाटील यांनी घेतला होता. त्यानंतर पुन्हा भास्कर जाधव यांनी तातडीने भाजपची विधानसभा बंद करण्याचे आदेश सुरक्षा अधिकाऱ्यांना दिले होते. त्यानंतर अधिकाऱ्यांनी भाजपच्या प्रतिविधानसभेत जाऊन माईक बंद पाडला आणि सभा घेण्यास मनाई केली. या कारवाईमुळे फडणवीस कमालीचे संतापले. सभा आटोपती घेत विधानभवनाच्या आवारातच फडणवीस यांनी पुन्हा एकदा ठिय्या मांडला आहे.