१२५ वर्षे आरामात जगू शकणार मानव

करोना मुळे जगभरात कोट्यवधी मृत्यू झाले आहेत आणि त्यात तरुण, वृद्ध, लहान मुले सर्वांचा समावेश आहे. भविष्यात अजून असे कोणते साथीचे रोग येतील आणि माणसांचे जीव घेतील ही भीती अखिल मानव जातीच्या मनात बसली असतानाच संशोधकांनी एक चांगली बातमी दिली आहे. हे संशोधन अमेरिका, जपान, कॅनडा, ब्रिटन व अन्य युरोपीय देशातील ज्येष्ठ नागरिकांवर केले गेले आहे.

या शतकाच्या अखेरपर्यंत माणसाचे आयुष्मान वाढून १२५ ते १३० वर्षांवर गेलेले असेल असे हे संशोधन सांगते. वयाची १०० ओलांडलेल्या लोकांच्या माहितीवरून काही आडाखे संशोधकांनी मांडले आहेत. त्यानुसार ११० वर्षाच्या वर वय असलेल्या लोकांची संख्या वाढते आहे. २१०० सालापर्यंत माणूस १२५ ते १३२ वयापर्यंत जगेल असा तर्क मांडण्यामागे माणसाची वाढती उमेद जशी कारणीभूत आहे, त्याचप्रमाणे चांगले आणि भरपूर अन्न, स्वच्छ पाणी आणि उत्तम प्रकारच्या आरोग्य सुविधा यांचाही हातभार त्याला लागणार आहे.

युनिव्हर्सिटी ऑफ वॉशिंग्टन मधील या संशोधन टीमचे प्रमुख मायकेल पिअर्स म्हणतात एकूण परिस्थितीवरून माणूस किती जादा जगू शकतो याचा अंदाज करता येतो. आज जगभरात १० लाख लोक १०० वयाचे असून ६०० लोक ११० ते १२० या वयोगटात आहेत. ही जादू नाही. आजची लाइफस्टाइल, भरपूर पोषक अन्न, पाणी, स्वच्छता आणि वैद्यकीय क्षेत्रात रोज लागणारे नवे शोध यामुळे हे शक्य आहे. शतकाअखेरीपर्यंत ६८ टक्के लोक १२४ वर्षापर्यंत तर १३ टक्के लोक १३० वयापर्यंत जगतील. १३५ पर्यंत जगण्याची शक्यता मात्र खुपच कमी आहे.