बिकिनीची पंच्याहत्तरी

आज जगभरात होणाऱ्या सौंदर्यस्पर्धात बिकिनी राउंड हा मोठा इव्हेंट असतो. सिनेमा क्षेत्र आणि अन्य सेलेब्रिटी बिकिनी मधील फोटो शेअर करून नेहमीच चर्चेत राहतात. पण पूर्वी ही परिस्थिती नव्हती. आज बिकिनी घालणे ही आम बात आहे. ही बिकिनी ५ जुलै रोजी ७५ वर्षाची झाली आहे. ५ जुलै १९४६ रोजी पहिली बिकिनी घातली गेली होती. बिकीनीचा हा ७५ वर्षाचा प्रवास मोठा रोचक म्हणता येईल. फ्रांसच्या मेश्लीन बेर्निदिनी या मॉडेलने बिकीनीचे प्रथम प्रदर्शन केले आणि चर्च, मिडिया सह सर्वाना जोरदार सांकृतिक धक्का बसला. विशेष म्हणजे त्या नंतर दीर्घकाळ बिकीनीवर बंदी घातली गेली होती.

फ्रांसच्या,व्यवसायाने ऑटोमोबाईल इंजिनिअर असलेल्या लुई रिचर्ड याने पहिली बिकिनी बनविली. त्याचा परिवाराचा अंतर्वस्त्र निर्मिती व्यवसाय होता. त्वचेला घट्ट बसणारे हे वस्त्र लुईला फॅशन इव्हेंट मध्ये सादर करायचे होते पण ते घालायला त्यावेळची कोणतीच मॉडेल तयार नव्हती. शेवटी कॅसिनो मध्ये न्यूड डान्सर म्हणून काम करणारी मेश्लीन बेर्निदिनी हिने ती तयारी दाखविली आणि स्वीमिंग पूलवर तिने बिकीनीचे प्रदर्शन करून फोटो शूट केले. मेश्लीन बेर्निदिनी आजही जिवंत असून ९३ वर्षाची आहे.

फोटो शूट मध्ये मेश्लीन बेर्निदिनीच्या हातात एका काडेपेटी दिसते. याचा अर्थ हे वस्त्र काडेपेटीत मावेल असे आहे असा होता. लुईने केवळ ३० इंची कापडात ही बिकिनी बनविली होती. त्याकाळात वन पीस स्विम सुट होते पण टू पीस स्विमसुट ही क्रांती होती. ही बिकिनी १९५१ मध्ये प्रथम मिस वर्ल्ड स्पर्धेत दिसली आणि तिच्यावर त्यानंतर बंदी आली. युरोपीय देशात बीचवर बिकिनी घालून कुणी महिला आली तर तिला दंड केला जात असे.

या वस्त्राला बिकिनी नाव कसे पडले ती कथा सुद्धा मजेदार आहे. लुईने बिकिनी तयार करून तिचे प्रदर्शन केले ते पॅसीफिक बिकिनी नावाच्या छोट्या बेटावर. त्यावेळी १९४६ ते १९५८ या काळात या बेटावर ६० अणुस्फोट चाचण्या केल्या गेल्या होत्या आणि त्याचा नागरिकांना मोठा शॉक बसला होता. त्यामुळे हे वस्त्र पाहिले की लोकांना अणुस्फोटाप्रमाणेच शॉक बसेल या विचाराने लुईने या वस्त्राचे नामकरण बिकिनी असे केले.

हळूहळू बिकिनी महिला स्वातंत्र्याचे प्रतिक म्हणून ओळखली जाऊ लागली. ६० च्या दशकात अमेरिकेत बिकिनी लोकप्रिय झाली. प्रसिद्ध अभिनेत्री ब्रीगेट बर्डोक हिने १९५३ मध्ये कान्स महोत्सवात बिकिनी घालून लोकांचे लक्ष्य वेधून घेतले होते. भारताची गोष्ट सांगायची तर १९६७ मध्ये प्रथम अभिनेत्री शर्मिला टागोर हिने अॅन इव्हिनिंग इन पॅरीस चित्रपटात टू पीस बिकिनी घालून चित्ररसिकांना धक्का दिला होता. मात्र त्याला विरोध असा फारसा झाला नव्हता.