तुम्ही सुद्धा उघडू शकता स्वीस बँकेत खाते

स्वीस बँक आणि काळा पैसा असे जणू समीकरण बनले आहे. जून मधील एका अहवालानुसार २०२० मध्ये भारतीयांनी स्वीस बँकात रेकॉर्ड धन जमा केले असून हा आकडा २०७०० कोटी इतका आहे. गेल्या १३ वर्षातली हे सर्वाधिक रक्कम आहे. पण स्वीस बँकेत फक्त काळा पैसा जमा करता येतो असे मात्र नाही. सर्वसामान्य माणूस सुद्धा या बँकेत खाते उघडू शकतो. स्वित्झर्लंड मध्ये ४०० बँका असून निसर्गसौंदर्य, घड्याळे, स्वीस चॉकलेट प्रमाणेच या बँका नेहमी चर्चेत असतात.

स्वीस बँकेमध्ये परदेशातील नागरिकांना खाते उघडून देण्यामागे ज्या देशातील राजकीय परिस्थिती अस्थिर आहे, त्या देशातील नागरिकांचा पैसा सुरक्षित रहावा हा मूळ हेतू होता. पण त्याचा वापर चुकीच्या पद्धतीने ग्राहकांनी केला. सामान्य माणसासाठी सुद्धा आजही या बँका तितकीच सुरक्षा देतात. तुम्हाला येथे खाते उघडायचे असेल तर ऑनलाईन अर्ज करता येतो. सरकारी संस्थेने प्रमाणित केलेली ओळख पटविणारी कागदपत्रे जमा करावी लागतात. हे काम ईमेल वरून सुद्धा करता येते. पण तुम्हाला जर नाव गुप्त ठेऊन किंवा विना नाव खाते उघडायचे असेल तर मात्र बँकेत स्वतः उपस्थित व्हावे लागते. पर्सनल, सेव्हिंग किंवा इन्वेस्टमेंट प्रकारात येथे खाते उघडता येते. विना नावाच्या खात्याला नंबर्ड अकौंट म्हणले जाते. त्यासाठी मोठी रक्कम भरावी लागते आणि दरवर्षी मेंटेनन्स म्हणून २० हजार रुपये भरावे लागतात. या प्रकारच्या अकौंट मध्ये व्यक्तीची ओळख एका विशिष्ट नंबरने असते.

करचुकवेगिरी मधून मिळालेल्या पैसा स्वीस बँकात मोठ्या प्रमाणावर जमा होतो हे आजचे उघड गुपित आहे. स्वीस बँकेच्या गोपनीयता नियमात वास्तविक स्वित्झर्लंड मध्ये जो गुन्हा मानला जातो असा कोणताही गुन्हा खातेदाराशी जोडलेला नसावा असा नियम आहे. १७ व्या शतकात या बँकांची सुरवात झाली आणि आजही स्वीस फेडरल बँकिंग अॅक्ट नुसार गुप्तता कायदा पालन केले जाते. ग्रांड कौन्सिल ऑफ जिनेव्हाने त्यासाठी एक कोड तयार केला ज्यानुसार अकौंट होल्डरची माहिती कुणाशीच शेअर केली जात नाही.

मात्र गेल्या ३०० वर्षापासून या बँका टॅक्स हेवन ठरल्या आहेत. आजही या बँकांचे नियम तितकेच कडक आहेत. पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्ध काळात जर्मनीने स्वीस बँकेत पैसा जमा करणे यासाठी मृत्युदंड शिक्षा निश्चित केली होती असे सांगितले जाते.