संजय राऊतांनी युतीबद्दल बोलताना दिला आमीर खान-किरण रावच्या घटस्फोटाचा दाखला


मुंबई: शिवसेनेचे खासदार संजय राऊत व भाजपचे आमदार आशिष शेलार यांच्यात पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या बैठकीवरून उलटसुलट चर्चा सुरू आहेत. याबद्दल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या एका वक्तव्यानंतर आता संजय राऊत यांनी शिवसेना व भाजपमधील संबंधांची अभिनेता आमीर खान व किरण राव यांच्या घटस्फोटाशी तुलना केली आहे.

शिवसेना-भाजपची युती भविष्यात पुन्हा होण्याची शक्यता आहे का, असा प्रश्न आज पत्रकारांनी विचारला असता फडणवीस यांनी थेट काही बोलण्याचे टाळले आहे. राजकारणात ‘जर आणि तर’ला अर्थ नसतो. काही मतभेद शिवसेना व भाजपमध्ये असतील, पण आम्ही एकमेकांचे शत्रू नसल्याचे फडणवीस म्हणाले होते. राऊत यांना त्याबाबत पत्रकारांनी विचारले असता त्यांनी फडणवीसांचे वक्तव्य योग्य असल्याचे सांगितले. मी हेच गेल्या अनेक दिवसांपासून बोलत आहे. आमचे राजकीय मार्ग बदलले आहेत. पण नेत्यांमध्ये संवाद कायम आहे. शिवसेना-भाजप म्हणजे काही भारत-पाकिस्तान नाही. आमच्यामध्ये भेटीगाठी होत असतात. चर्चा होत असते, असे राऊत म्हणाले.

राऊत यांनी भाजप व शिवसेनेमधील बदललेल्या संबंधांबाबत बोलताना आमीर खान व किरण राव यांच्यातील घटस्फोटाचा दाखला दिला. आमीर आणि किरण रावचे यांनी आपले मार्ग बदलले आहेत. पण त्यांची मैत्री कायम राहणार आहे. तसेच आमचे देखील आहे. राजकारणात संबंध राहतीलच. पण याचा अर्थ आम्ही एकत्र येऊन सरकार स्थापन करणार असा होत नसल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले.

फडणवीस युतीबद्दल बोलताना परिस्थितीनुसार निर्णय घेतला जाऊ शकतो असेही म्हणाले होते. राऊत त्यावर बोलताना म्हणाले, परिस्थिती आता काय आहे आणि उद्या काय होईल याबद्दल कुणीही भविष्य वर्तवू शकत नाही. पण आता जी व्यवस्था आहे, ती पुढील पाच वर्षे कायम राहील. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार उत्तम चालले आहे.