हाफिज सईदच्या घराबाहेर भारतानेच स्फोट घडवल्याचा पाकिस्तानचा आरोप


नवी दिल्ली – मुंबईत झालेल्या २६/११ बॉम्ब हल्ल्यांचा मुख्य सुत्रधार असणाऱ्या हाफिज सईदच्या पाकिस्तानमधील लाहोरमधील जौहर टाऊन येथील अकबर चौकातील घराबाहेर २३ जून रोजी मोठा स्फोट झाला. आता पाकिस्तानने या प्रकरणामध्ये भारतावर आरोप केले आहे. रविवारी पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) मुईद यूसुफ यांनी केलेल्या आरोपांनुसार २००८ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सुत्रधार आणि जमात-उद-दावाचा प्रमुख असणाऱ्या सईदच्या घराबाहेर झालेल्या स्फोटामध्ये एका भारतीय नागरिकाचा हात होता.

या हल्ल्यामध्ये भारतीय व्यक्तीचा सामावेश असल्याचा दावा पंजाब पोलिसांचे प्रमुख आणि माहिती मंत्री फवाद चौधरी यांच्यासोबत घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेला संबोधित करताना एनएसए यूसुफ यांनी केला आहे. भारताची गुप्तचर यंत्रणा असणाऱ्या रॉशी या व्यक्तीचा संबंध असल्याचेही सांगण्यात आले आहे. इलेक्ट्रॉनिक उपकरणे या दहशतवाद्यांकडून जप्त करण्यात आली, असून ती फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आली. या चाचण्यानंतरच आम्ही हल्ल्यातील मुख्य दहशतवादी आणि हल्ला घडवून आणणाऱ्यांची ओळख पटवली असल्याचे एनएसए यूसुफ यांनी म्हटले आहे.

एनएसए यूसुफ यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय गुतप्तचर यंत्रणा रॉशी (रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनलिसिस विंग) संबंधित या हल्ल्याचा कट रचणारा व्यक्ती असून दुसरा भारतामध्ये आहे, हे तुम्हाला सांगताना आमच्या मनात कोणतीही शंका नाही, असे म्हटले आहे. पण ही व्यक्ती नक्की कोण आहे, याची माहिती यूसुफ यांनी दिली आहे.

पाकिस्तानमधील वेगवेगळ्या यंत्रणांच्या सहकार्याने आमच्याकडे हल्ला घडवून आणणाऱ्यांची खोटी नाव, खरी ओळखपत्रं आणि संक्षयित स्थानकांबद्दलची माहिती आहे, असेही यूसुफ म्हणाले. पंतप्रधान इम्रान खान यांनी या पत्रकार परिषदेनंतर ट्विटरवरुन, या बॉम्बस्फोटाचा तपास करणाऱ्या यंत्रणांनी आज देशाला यासंदर्भातील तपासाची माहिती देण्याचे निर्देश मीच दिले होते. तसेच देशातील नागरिक आणि लष्कराशीसंबंधित गुप्तचर यंत्रणांच्या मदतीने दहशतवादी आणि त्यांच्या आंतरराष्ट्रीय संबंधांची माहिती समोर आली, असे इम्रान म्हणाले आहेत.

२३ जून रोजी लाहोरमधील जौहर टाऊन येथील अकबर चौकातील बोर्ड ऑफ रेव्हेन्यू हाऊसिंग सोसायटीमधील सईदच्या घराबाहेर हा बॉम्बस्फोट झाला होता. एका कारच्या मदतीने हा स्फोट घडवण्यात आलेल्या ज्यात तिघांचा मृत्यू झाला आणि २४ जण जखमी झाले. या हल्ल्याची जबाबदारी कोणत्याही संघटनेने घेतलेली नाही. यापूर्वीच भारताने पाकिस्तानमधील बॉम्बस्फोटांमध्ये भारताचा सहभाग असल्याचे आरोप फेटाळून लावले आहेत. संपूर्ण आंतरराष्ट्रीय समुदायाला पाकिस्तानच्या या डावपेचांची माहिती आहे. इस्लामाबादकडून आर्थिक पाठबळ मिळत असल्याचे इतर कोणी नाही तर पाकिस्ताननेच मान्य केल्याचाही टोला भारताने लगावला आहे.