काल दिवसभरात देशात 39 हजार 796 नवे रुग्णांची नोंद, तर 723 कोरोनाबाधितांचा मृत्यू


नवी दिल्ली – जीवघेण्या कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेचा देशात प्रादुर्भाव कमी होताना दिसत आहे. गेल्या 24 तासांत देशात 39 हजार 796 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तसेच 723 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. भारतात सलग सातव्या दिवशी 50 हजारांहून कमी कोरोना रुग्णांच्या दैनंदिन संख्येचे नोंद करण्यात आली आहे. तसेच कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या आकड्यातही घट झाली आहे.

काल दिवसभऱात 14 लाख 81 हजार 583 कोरोना प्रतिबंधक लसींचे डोस देण्यात आले आहेत. याबाबत आयसीएमआरने दिलेल्या माहितीनुसार, भारतात रविवारी 15 लाख 22 हजार 504 सॅम्पल्स टेस्ट करण्यात आले आहेत. त्यानंतर आतापर्यंत एकूण 41 कोटी 97 लाख 77 हजार 457 सॅम्पल्स टेस्ट करण्यात आले आहेत.

महाराष्ट्रात दैनंदिन कोरोनाबाधितांची संख्या काही दिवसांपासून दहा हजारांच्या आत येऊ लागली आहे. काही दिवसांपासून रोज 9 हजारांच्या आसपास दैनंदिन रुग्ण वाढत आहेत. अशात काल (रविवारी) केवळ 3,378 रुग्णांनाच डिस्चार्ज मिळाला आहे. तर 9,336 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर राज्यातील अॅक्टिव्ह केसेस हळू हळू वाढू लागल्या आहेत. अॅक्टिव्ह केसेस आता एक लाख 23 हजारांच्यावर गेल्या आहेत. काल मालेगाव आणि गोंदियामध्ये एकही कोरोना रुग्णांची नोंद सरकारी आकडेवारीनुसार झालेली नाही. तर कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक 1461 तर कोल्हापूर शहरात 389 असे एकूण 1850 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. सांगलीचा आकडाही हजारांच्या वर नोंदवला आहे. आज 38 मनपा क्षेत्र आणि जिल्ह्यांमध्ये एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही.

गेल्या काही दिवसांपासून मुंबईत कोरोना नियंत्रणात असल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासात मुंबईत 548 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 705 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत मुंबईत 6,98,696 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 96 टक्के झाला आहे. तर गेल्या 24 तासात मुंबईत 24 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत 8,114 सक्रिय रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर 767 दिवसांवर गेला आहे.