तालिका अध्यक्ष धक्काबुक्की प्रकरणी भाजपच्या 12 आमदारांचे एक वर्षासाठी निलंबन


मुंबई : भाजपच्या आमदारांचे विधानसभा तालिका अध्यक्षांना धक्काबुक्की केल्या प्रकरणी निलंबन करण्यात आले आहे. एक वर्षासाठी गैरवर्तन करणाऱ्या आमदारांचे निलंबन करण्यात आले आहे. अभिमन्यू पवार, आशिष शेलार, अतुल भातखळकर, जयकुमार रावल, राम सातपुते, गिरीश महाजन, संजय कुटे, नारायण कुचे, पराग आळवणी, हरिश पिंपळे, नारायण कुचे, कीर्तिकुमार भांगडिया यांचे निलंबन करण्यात आले आहे. भाजपने विधानसभा अध्यक्षांच्या या कारवाईनंतर अधिवेशनावर बहिष्कार टाकला आहे.

सभागृहात मंत्री छगन भुजबळ यांनी मांडलेल्या ओबीसी समाजाच्या संबंधित ठरावावरुन गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. सभागृहातील गोंधळानंतर त्यातून मार्ग काढण्यासाठी विधानसभा अध्यक्षांच्या दालनात सत्ताधारी आणि विरोधक बसून तोडगा काढतात. त्यावेळी तालिका अध्यक्ष असलेल्या भास्कर जाधव यांना धक्काबुक्की झाल्याचा आरोप करण्यात आला. तर अशी धक्काबुक्की झालीच नाही, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

अनिल परब यांनी या गैरवर्तन करणाऱ्या 12 आमदारांच्या गैरवर्तनाबद्दल त्यांना निलंबित करण्यात यावे असा ठराव मांडला. या सर्व सदस्यांचे निलंबन एक वर्षांसाठी करण्यात आले असून त्यांना मुंबई आणि नागपूर विधीमंडळाच्या आवारात एक वर्षे येण्यास बंदी घातली आहे.

तालिका अध्यक्ष भास्कर जाधवांनी मुख्यमंत्र्यांकडे मला धक्काबुक्की आणि शिवीगाळ केली अशी तक्रार केली होती. हे प्रकरण मुख्यमंत्र्यांनी गांभिर्याने घेतले आणि निलंबनाची कारवाई करण्याचा निर्णय घेतला.