बिगबी यांच्या प्रतीक्षा बंगल्याची भिंत पाडणार बीएमसी

बॉलीवूड दुनियेत बिग बी नावाने लोकप्रिय असलेले अमिताभ बच्चन यांच्या जुहू मार्गावरील प्रतीक्षा या प्रसिद्ध बंगल्याची भिंत मुंबई महापालिका पाडणार आहे. बिग बी यांचा प्रतीक्षा हा मुंबईतील पहिला बंगला आहे. संत ज्ञानेश्वर मार्ग रुंदीकरणासाठी प्रतीक्षा या बंगल्याची एक भिंत पाडली जाणार आहे. वास्तविक २०१७ मध्ये या संदर्भातील नोटीस बिग बी यांना दिली गेली होती मात्र त्यांनी नोटिसीला अद्यापी उत्तर दिलेले नाही असे समजते.

मिळालेल्या माहितीनुसार संत ज्ञानेश्वर मार्गावर होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी हा रस्ता ४५ फुटावरून ६० फुटी केला जाणार आहे. या रुंदीकरणात बिग बी यांचा बंगला आणि उद्योजक केवी सत्यमूर्ती यांचा बंगला अडथळा ठरत होते. पैकी सत्यमूर्ती यांनी बीएमसी नोटिसीला उत्तर देताना न्यायालयातून स्थगिती मिळविली होती आणि बीएमसीने ही स्थगिती उठवून घेतली होती. त्यात सत्यमूर्ती यांचा बंगला पाडला गेला पण बिग बी यांच्या भिंतीला हात लावला गेला नव्हता. त्यामुळे बीएमसीवर पक्षपाताचा आरोप केला जात होता.

बिग बी यांचा जुहू येथेच जलसा नावाचा बंगला आहे आणि तेथेच बच्चन कुटुंबियांचे वास्तव्य आहे. या बंगल्याजवळ जनक नावाचा त्यांचा तिसरा बंगला असून त्याचा वापर कार्यलय म्हणून केला जातो असे समजते.