जगातील सर्वात मोठा पिकअप ट्रक पाहिलात?

चार चाकी वाहनात ट्रक हे साधारण मोठे वाहन आहे. खूप सामान आणि लांब पल्ला करणारे पिकअप ट्रक आपल्या नेहमीच पाहण्यात येतात. पण जगातील सर्वात मोठ्या पिकअप ट्रक बद्दल फार लोकांना माहिती नसावी. हा ट्रक आहे युएई मध्ये. आणि त्याचा मालक आहे रेनबो शेख उर्फ शेख हमद बिन हमदान अल नायेज. रेनबो शेख हा सत्ताधारी परिवाराचा सदस्य आहे.

रेनबो शेख यांनी त्यांच्या खास कलेक्शन साठी हा ट्रक बनवून घेतला आहे. युएईच्या वाळवंटात सहज फिरणाऱ्या डॉज पॉवर वॅगनची ही भली मोठी आवृत्ती आहे. क्लासिक डॉज पॉवर वॅगनच्या मूळ आकाराच्या आठ पट मोठा असा हा ट्रक ५० टन वजनाचा आहे. या ट्रक मध्ये किचन, लिव्हिंग रूम आणि बाथरूम सुविधा आहे. हा ट्रक फक्त म्युझियमचा एक भाग नाही तर त्याची नोंदणी आबूधाबीच्या रस्त्यांवर चालणारा ट्रक म्हणून केली गेली आहे.

हे अवाढव्य मॉडेल १९५०च्या दशकातील डॉज पॉवर वॅगन पिकअप ट्रकवर आधारित आहे. हे मॉडेल निवडण्यामागाचे कारण म्हणजे त्या दशकात ज्या बड्या तेल व्यापाऱ्यानी पहिली वाहने वापरली त्यात हे मॉडेल समाविष्ट होते. रेनबो शेख यांनी आबुधाबी मध्ये नॅशनल ऑटो म्युझियम उभारले असून त्यात विंटेज कार्ससह २०० कार्स आहेत. या शेखला कार्सचा भयंकर शौक असून त्यांनी सात मर्सिडीज खरेदी करून त्यांना इंद्रधनुषी रंगात सजविले आहे. त्यावरून या शेखला रेनबो शेख असे नाव पडले आहे.